गोव्याचा यशस्वी प्रशिक्षकावर पुन्हा विश्वास

गोव्याचा यशस्वी प्रशिक्षकावर पुन्हा विश्वास
Goa retains the previous coach

पणजी :  गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) माजी कसोटीपटू दोड्डा गणेश यांची रणजी संघ प्रशिक्षकपदी फेरनिवड करून त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविला. गोव्याच्या क्रिकेट इतिहासात ४७ वर्षीय माजी वेगवान गोलंदाजाने यशस्वी प्रशिक्षक या नात्याने ठसा उमटविला आहे.
व्यावसायिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या गणेश यांची गोव्याच्या रणजी संघ प्रशिक्षकपदी पाचव्यांदा नियुक्ती झाली आहे.

कर्नाटकतर्फे रणजी क्रिकेट स्पर्धेत २००५-०६ मोसमात शेवटच्या वेळेस खेळल्यानंतर गणेश २००६-०७ मोसमात गोव्याकडून खेळण्यास इच्छुक होते, पण संघ बदल प्रक्रियेत आवश्यक असलेली एनओसी (ना हरकत दाखला) वेळेवर मिळू शकला नाही, त्यामुळे त्यांचा मोसम वाया गेला. त्या मोसमात गोवा क्रिकेट संघटनेने त्यांच्याकडे रणजी संघाचे  सहप्रशिक्षकपद सोपविले. २००७-०८ मोसमात ते गोव्याचे पूर्णवेळ प्रशिक्षक बनले. 

गतमोसमात गोव्याला रणजी प्लेट गटात खेळावे लागले. गट कमजोर होता, तरीही पुदूचेरी, चंडीगडसारखे तुल्यबळ प्रतिस्पर्धी असल्याने आव्हान कठीणही होते. गणेश यांच्या मार्गदर्शनाखाली मोसमाच्या सुरवातीस गोव्याच्या सीनियर संघाला विशेष सूर गवसला नाही. विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धा आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याची कामगिरी निराशाजनक ठरली, पण रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत संघाने उसळी घेत जोमदार खेळ केला. प्लेट गटात अपराजित राहत त्यांनी रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याचा मान मिळविला. बलाढ्य गुजरातविरुद्ध गोव्याला हार पत्करावी लागली.  
गणेश यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याच्या रणजी संघाने सकारात्मक दृष्टिकोन अवलंबिल्याचे दिसून आले आहे.

नव्या रणजी मोसमाचे अजून चित्र स्पष्ट झालेले नाही. गणेश यांना गोव्याच्या संघाचे कच्चे, प्रबळ दुवे माहीत आहेत, तरीही कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर आगामी मोसमातील संघाची वाटचाल आव्हानात्मक असू 
ॆशकते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com