गोव्याची ‘संतोष करंडक’ मोहीम अर्ध्यावर

किशोर पेटकर
मंगळवार, 14 जुलै 2020

पश्चिम विभागात दणकेबाज कामगिरीपण मुख्य फेरी झालीच नाही

पणजी

संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या पश्चिम विभागीय फेरीत गतवर्षी सप्टेंबरमध्ये गोव्याने दणकेबाज खेळ केलापण मुख्य फेरी न झाल्यामुळे त्यांची मोहीम अर्ध्यावरच राहिली.

राष्ट्रीय स्पर्धेचा दर्जा असलेल्या संतोष करंडक स्पर्धेची पश्चिम विभागीय फेरी गतवर्षी गोव्यातच झाली होती. यजमान संघाने ब गटात तिन्ही सामने जिंकून मुख्य फेरीत प्रवेश केला. प्रतिस्पर्ध्यांवर तब्बल २३ गोल डागताना लेव्हिनो अँथनी परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने फक्त एक गोल स्वीकारला होता. गोव्याने राजस्थानला २-०मध्य प्रदेशला ७-१ असे हरविलेतर दादरा-नगर हवेलीचा १४-० फरकाने धुव्वा उडविला. अ गटात सहा वेळच्या राष्ट्रीय विजेत्या बलाढ्य सेनादलाने महाराष्ट्राला मागे टाकून मुख्य फेरीसाठी पात्रता मिळविली होती.

विविध कारणास्तव मुख्य फेरी लांबत गेलीनंतर कोविड-१९ मुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने २०१९-२० मोसम आटोपता घेतला. त्यामुळे पात्र ठरलेल्या संघांना मुख्य फेरीत खेळता आले नाही. २०२०-२१ मोसमात संतोष करंडक स्पर्धा होणार का याबाबत महासंघाचे अजून सूचीत केलेले नाही. स्पर्धेला देशातील कोरोना विषाणू महामारीची आडकाठी येऊ शकते.

 शेवटचे विजेतेपद तपापूर्वी

संतोष करंडक स्पर्धेत गोवा पाच वेळचा माजी विजेता संघ आहेपण २००८-०९ नंतर त्यांना राष्ट्रीय विजेतेपद मिळविण्यास अपयशच आलेले आहे. गोव्यात २०१६-१७ मोसमात झालेल्या स्पर्धेत यजमानांनी अंतिम फेरी गाठली. बांबोळीच्या ॲथलेटिक्स स्टेडियमवरील लढतीत मानवीर सिंगने जादा वेळेतील खेळात केलेल्या गोलमुळे बंगालने १-० फरकाने विजय नोंदविला आणि पुन्हा एकदा करंडकावर नाव कोरले. स्पर्धेच्या इतिहासात गोवा आणि बंगाल या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत ८ अंतिम लढती झाल्या आहेत. बंगालने तब्बल ६ वेळा गोव्याला नमविले आहे. २०१८-१९ मोसमात गोव्याने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होतीपरंतु यजमान पंजाबकडून १-२ फरकाने हार पत्करावी लागल्याने गोव्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. त्या मोसमातील संपूर्ण स्पर्धेतील गोव्याचा तो एकमेव पराभव होता.

 संतोष करंडक स्पर्धेत गोवा...

- १९७८-७९ मोसमात पहिल्यांदा अंतिम फेरीश्रीनगर येथे बंगालकडून १-० फरकाने हार

- १९८२-८३ मोसमात बंगालसह संयुक्त विजेतेपदत्यानंतर १९८३-८४ मध्ये चेन्नई येथे पंजाबला हरवून करंडक राखला

- एकूण १३ वेळा अंतिम फेरीत५ वेळा विजेतेपद८ वेळा उपविजेतेपद

- शेवटचे विजेतेपद २००८-०९ मोसमातचेन्नई येथे अंतिम लढतीत बंगालवर पेनल्टी शूटआऊटवर मात

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या