गोव्यातील बॉक्सिंगबाबत क्रीडामंत्री अनभिज्ञ!

goa boxing.jpg
goa boxing.jpg

पणजी: गोव्याचे क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर (Manohar ajgaonkar) राज्यातील बॉक्सिंग (Boxing) खेळाबाबत अनभिज्ञ आहेत, त्यामुळेच गेल्या पाच वर्षांत गोवा बॉक्सिंग असोसिएशनला देय असलेले 22 लाख रुपयांचे अनुदान रखडले आहे, असा आरोप संघटनेचे उपाध्यक्ष आणि आंतराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी (आयटीओ) लेनी डिगामा यांनी केला आहे. (Goa Sports Minister Manohar Ajgaonkar is not paying attention to boxing in the state)

पुढील महिन्यात जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने डिगामा यांच्याकडे बॉक्सिंग स्पर्धेसाठी मुल्यांकनकर्ते ही जबाबदारी सोपविली आहे. या कामगिरीसाठी निवड झालेले ते एकमेव आशियाई आहेत. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमधील ते दीर्घानुभवी आयटीओ आहेत.

ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल डिगामा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना आपल्या निवडीचे पत्र सादर केले, त्यानंतर डिगामा पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले, की मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बॉक्सिंगला सर्वतोपरी साह्य करण्याचे आश्वासन दिले आहे, पण क्रीडामंत्री बाबू आजगावकर राज्यातील बॉक्सिंग खेळाबाबत अनभिज्ञ आहेत. आम्ही गोवा क्रीडा प्राधिकरणाशी वारंवार संपर्क साधलेला आहे, प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमच्या स्पर्धेसाठी निमंत्रित केले, पण आजवर काहीच मदत लाभलेली नाही. बॉक्सिंग स्टेडियमचीही दुरवस्था झाली आहे.

सुमारे अडीच वर्षांपूर्वी आपण क्रीडामंत्री आजगावकर यांची भेट घेऊन त्यांना प्रलंबित अनुदानाची माहिती दिली होती. त्यावेळी गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाईही उपस्थित होते, पण त्यानंतर सारं काही ठप्प आहे, अशी खंत डिगामा यांनी व्यक्त केली.

टोकियो ऑलिंपिकसाठी निवड झाल्याबद्दल राज्य सरकारने काही मदत केल्यास त्यातील अर्धी रक्कम आपण गोवा बॉक्सिंग असोसिएशनला देणार आहे, जेणेकरून राज्यातील बॉक्सर्सना प्रेरणा मिळेल, असे डिगामा यांनी नमूद केले. गोव्यात बॉक्सिंगसाठी आठ प्रशिक्षक आहेत, ते सर्व उत्तर गोव्यात नियुक्त आहेत. दक्षिण गोव्यात बॉक्सिंगसाठी आवश्यक आक्रमकता आहे, पण तेथे प्रशिक्षणाची व्यवस्था शासनातर्फे करण्यात आलेली नाही, याबद्दल डिगामा यांनी खंत व्यक्त केली.

क्रीडामंत्र्यांवरील आरोपाबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन

दरम्यान, लेनी डिगामा यांनी क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले, आपण डिगामा यांचे ऑलिंपिक नियुक्तीबाबत अभिनंदन केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com