गोवा टेबल टेनिस संघटनेचे सचिव सुरेश भांगी यांचे निधन

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

गोवा टेबल टेनिसचे सचिव, तसेच इतर पदांवर त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. १९९७ साली गोव्यात प्रतिष्ठेच्या आशियाई युवा टेबल टेनिस स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले होते, त्यावेळीही ते संघटनेचे सचिव होते

पणजी

सुमारे चार दशके गोवा टेबल टेनिस संघटनेच्या प्रशासकीय कामकाजात विविध पदी ठसा उमटविलेले सुरेश पांडुरंग शेणवी भांगी यांचे सोमवारी रात्री निधन झाले. मृत्यसमयी ते ६५ वर्षांचे होते आणि गोवा टेबल टेनिस संघटनेच्या सचिवपदी कार्यरत होते.
कालापूर येथील सुरेश भांगी स्टेट बँकेचे माजी अधिकारी, तसेच ढवळी येथील श्री वामनेश्वर देवस्थानचे माजी सचिव होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल गोवा टेबल टेनिस संघटनेचे पदाधिकारी, आजी-माजी खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे. ‘‘आमचे सचिव सुरेश भांगी यांच्या निधनाने आम्हाला अतीव दुःख होत आहे. ते संघटनेचे समर्थ पदाधिकारी होते. गोव्यातील टेबल टेनिससाठी त्यांनी दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,’’ असे गोवा टेबल टेनिस संघटनेने त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.
गोवा टेबल टेनिसचे सचिव, तसेच इतर पदांवर त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. १९९७ साली गोव्यात प्रतिष्ठेच्या आशियाई युवा टेबल टेनिस स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले होते, त्यावेळीही ते संघटनेचे सचिव होते. मागील काही वर्षांत गोव्यात झालेल्या विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धांच्या सफल आयोजनात त्यांनी अथक मेहनत घेतली होती, असे गोवा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष व्हेरो नुनीस यांनी भांगी यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले.
भांगी शेवटपर्यंत राज्यातील टेबल टेनिसच्या विकासासंदर्भात सक्रिय होते. एप्रिलमध्ये ‘गोमन्तक’ला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी, ‘‘गोमंतकीय टेबल टेनिसपटूंनी केवळ राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही यश प्राप्त केले आहे. नवोदित आणि उदयोन्मुख गुणवत्तेस खतपाणी घालणे आणि त्यातून पदक विजेत्यांची निर्मिती करणे हे आमचे ध्येय आहे. यासंदर्भात आम्ही सरकारला प्रस्ताव सादर केलेला आहे. सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळेल आणि गोव्यातील टेबल टेनिस सुरळीत होण्याची आम्हाला आशा आहे,’’ असे सांगितले होते.

संबंधित बातम्या