Goa Vs Haryana: पावसाच्या व्यत्ययानंतर गोवा-हरियाणाची बरोबरी, कवठणकरचे शानदार 'शतक'

Snehal Kavthankar: पावसाच्या व्यत्ययामुळे व्हीजेडी पद्धतीने गोवा-हरियाणा यांच्यातील विजय हजारे करंडक स्पर्धेतील सामना बरोबरीत सुटला.
Snehal Kavthankar
Snehal KavthankarDainik Gomantak

Goa Vs Haryana: विजय हजारे करंडक या एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेत बुधवारी सी ग्रुपमधील गोव्याचा सामना हरियाणाविरुद्ध झाला. पण पावसाच्या व्यत्ययामुळे व्हीजेडी पद्धतीच्या सहाय्याने हा सामना बरोबरीतच सुटला. तरी, गोव्याकडून स्नेहल कवठणकरने शतकी खेळी करत चमकदार कामगिरी केली.

केएससीए क्रिकेट ग्राऊंड, अलुर येथे झालेल्या या सामन्यात गोव्याने (Goa) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गोव्याने 50 षटकांत 9 बाद 261 धावा धावफलकावर लावल्या. त्यानंतर 262 धावांचा पाठलाग करताना हरियाणा 23 षटकांत 5 बाद 154 धावांवर असताना पावसाच्या व्यत्ययाने खेळ थांबला. नंतर पुढे खेळ सुरू न झाल्याने व्हीजेडी पद्धतीने सामना बरोबरीत असल्याचे घोषित करण्यात आले.

Snehal Kavthankar
Casinos in Mandovi: मांडवीतील कॅसिनो आणि थकीत वीज बिलाबाबत गोवा मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

हा सामना बरोबरीत सुटल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 2 गुण बहाल करण्यात आले. त्यामुळे आता गोव्याचे 12 गुण झाले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 7 सामने खेळले आहेत. यातील 2 सामन्यात गोव्याने विजय मिळवला असून 3 पराभव स्विकारले आहेत. तसेच एका सामन्याचा निकाल लागला नाही, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे आता गोव्यासाठी बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

कवठणकरचे शतक

गोव्याचा अनुभवी फलंदाज स्नेहल कवठणकरने हरियाणाविरुद्ध (Haryana) इशान गाडेकरसह सलामीला 88 धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात करून दिली होती. इशान 47 धावांवर बाद झाल्यानंतरही त्याला कर्णधार सुयश प्रभुदेसाईने चांगला साथ देत दुसऱ्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी रचली. पण त्यानंतर गोव्याकडून मोठी भागीदारी झाली नाही.

पण, कवठणकरने यादरम्यान त्याचे लिस्ट ए क्रिकेट प्रकारातील तिसरे शतक पूर्ण केले. त्याने 115 चेंडूत 104 धावांची खेळी करताना 9 चौकार आणि 3 षटकार मारले. त्यामुळे गोव्याला 250 धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत झाली.

गोव्याकडून प्रभुदेसाईने 30 धावा केल्या, तर सिद्धेश लाडने 24 धावा केल्या. अखेरीस अर्जून तेंडुलकरने 1 चौकार आणि 1 षटकारासह 6 चेंडूत नाबाद 14 धावा केल्या. हरियाणाकडून चांगल्या लयीत असलेल्या राहुल तेवतियाने 3 विकेट्स घेतल्या.

Snehal Kavthankar
Goa VS Arunachal Pradesh: दुबळ्या 'अरुणाचल'वर 'गोव्या'चा एकतर्फी विजय

लाड-तेंडुलकरची आशादायक कामगिरी

सिद्धेश लाड आणि अर्जून तेंडुलकर ही जोडी यावर्षी गोव्याकडून खेळत आहेत. त्यांच्या संघात येण्याने संघात समतोल साधला जातोय. हरियाणाविरुद्घ या दोघांनी फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही चांगले योगदान दिले.

हरियाणाचा सलामीवीर युवराज सिंगला 10 धावांवर तेंडुलकरने लाडच्या हातून झेलबाद केले. तर लाडने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या चैतन्य बिश्नोईला 47 धावांवर त्रिफळाचीत केले. तसेच लाडने निशांत सिंधूलाही 11 धावांवर बाद करत माघारी धाडले. त्यांच्याव्यतिरिक्त मोहित रेडकर आणि लक्ष्य गर्ग यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Snehal Kavthankar
Virat Kohli-Anushka Sharma: बापरे! विराट-अनुष्का भाड्याने घेतलेल्या फ्लॅटसाठी मोजले 'इतके' लाख

संक्षिप्त धावफलक:

गोवा : 50 षटकांत 9 बाद 261 (स्नेहल कवठणकर 104, इशान गाडेकर 47, सुयश प्रभुदेसाई 30, सिद्धेश लाड 24; राहुल तेवतिया 10-0-62-3, अन्शूल कंभोज 10-2-49-2)

वि. बरोबरी हरियाणा : 23 षटकांत 5 बाद 154 (चैतन्य बिष्णोई 47, कपिल हुडा 31 नाबाद, शिवम चौहान 23, राहुल तेवतिया 19 नाबाद; सिद्धेश लाड 4-0-33-2, लक्ष्य गर्ग 5-0-19-1, अर्जून तेंडुलकर 4-1-22-1, मोहित रेडकर 5-0-31-1)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com