
किशोर पेटकर
BCCI गोव्याचा यष्टिरक्षक-फलंदाज सोहम पानवलकर याची अखिल भारतीय विद्यापीठ क्रिकेट शिबिरासाठी निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतर्फे (एनसीए) शिबिर 30 मे ते 18 जून या कालावधीत गुजरातमधील सूरत येथे घेतले जाईल.
शिबिरासाठी निवड झालेला सोहम हा गोव्यातील एकमेव क्रिकेटपटू आहे. यावर्षी मार्चमध्ये छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ पातळीवरील विझी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे अखिल भारतीय ज्युनियर निवड समितीने शिबिरासाठी खेळाडूंची निवड केली.
पश्चिम विभागातून सोहमसह चार खेळाडूंची एनसीए शिबिरासाठी निवड झाली. शिबिरात दाखल होण्यापूर्वी खेळाडूंना वैद्यकीय व शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
विझी ट्रॉफी अखिल भारतीय विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत सोहम पश्चिम विभागातर्फे खेळला होता. या स्पर्धेतील तीन डावांत त्याने 40.33 च्या सरासरीने एका अर्धशतकासह 121 धावा केल्या. उत्तर विभागाविरुद्ध त्याने 82 चेंडूंत आक्रमक 83 धावा केल्या होत्या.
या स्पर्धेत त्याने पश्चिम विभागाचे नेतृत्वही केले. विझी ट्रॉफी स्पर्धेत सोहमने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत पाचवा क्रमांक पटकावला, पश्चिम विभागातर्फे त्याने सर्वाधिक धावा केल्या.
सोहमने फेब्रुवारीत झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत गोवा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. त्या स्पर्धेत त्याने एका अर्धशतकासह 36.75 च्या सरासरीने 147 धावा केल्या होत्या.
सोहम गोव्याच्या 25 वर्षांखालील क्रिकेट संघातून एकदिवसीय, तसेच कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळला आहे. तो आसगाव-बार्देश येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या (डीएम्स) महाविद्यालयाचा तृतीय वर्ष विद्यार्थी आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.