गोव्याचा संजय भारतीय दिव्यांग बुद्धिबळ संघात

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

गोव्याच्या संजय कवळेकर याची दिव्यांग खेळाडूंच्या पहिल्या फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिंपियाड बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. स्पर्धा २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत खेळली जाईल.

पणजी : गोव्याच्या संजय कवळेकर याची दिव्यांग खेळाडूंच्या पहिल्या फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिंपियाड बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. स्पर्धा २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत खेळली जाईल.

दृष्टिदोषांच्या बुद्धिबळात संजय आंतरराष्ट्रीय आर्बिटर असून गोवा क्रीडा प्राधिकरणात सीनियर बुद्धिबळ प्रशिक्षक या नात्याने कार्यरत आहेत. भारतीय संघात निवड झाल्याबद्दल संजयचे गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल, सचिव किशोर बांदेकर, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई, संयुक्त संचालक (प्रशिक्षण) ब्रुनो कुतिन्हो यांनी अभिनंदन केले आहे.

दृष्टिदोषांच्या बुद्धिबळात संजय आतापर्यंत सात राष्ट्रीय स्पर्धांत सहभागी झाला आहे. २००६ साली त्याला फिडे बुद्धिबळ मानांकन (१९४७) मिळाले, तसेच दृष्टिदोषांच्या राष्ट्रीय अ स्पर्धेसाठी २००८ व २०१८ साली पात्रता मिळविली. २०१० साली फातोर्डा येथे आणि २०११ साली महाराष्ट्रातील कणकवली येथे झालेल्या दृष्टिदोषांच्या राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविले. २०१२ साली राष्ट्रीय सांघिक दृष्टिदोषांच्या बुद्धिबळात टॉप बोर्डवरील सुवर्णपदक जिंकले होते.
प्रशिक्षक या नात्याने संजय गेली १९ वर्षे कार्यरत असून दोनशेहून जास्त बुद्धिबळपटूंनी त्याच्या मार्गदर्शनाखाली फिडे मानांकन प्राप्त केले आहे. २००४ राष्ट्रीय, तर २०१८ साली फिडे आर्बिटर बनल्यानंतर २०२० साली आंतरराष्ट्रीय आर्बिटर बनल्यामुळे आंतरराष्ट्रीय दृष्टिदोषांच्या बुद्धिबळातील पहिले आर्बिटर हा पराक्रम साधला.

संबंधित बातम्या