गोमंतकीय बुद्धिबळ पूर्णतः ऑनलाईन

किशोर पेटकर
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

व्यवस्थापकीय समिती बैठक वेबिनारद्वारे; राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे नियोजन

पणजी

कोविड-१९ महामारीमुळे गोव्यातील क्रीडा जगत ठप्प असले, तरी बुद्धिबळ सक्रिय आहे. गोवा बुद्धिबळ संघटनेने पूर्णतः ऑनलाईनचा ध्यास घेतला असून त्यांची व्यवस्थापकीय समिती बैठकही वेबिनार व्यासपीठावर झाली.

आगामी कालावधीत ऑनलाईन माध्यमांद्वारे दोन प्रमुख स्पर्धा घेण्याचे बुद्धिबळ संघटनेने ठरविले आहे, त्यापैकी एक स्पर्धा राष्ट्रीय पातळीवरील असेल. या निर्णयावर वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. सुमारे दोन तास चाललेल्या या ऑनलाईन बैठकीत सर्व पदाधिकारी आणि बाराही तालुक्यांतील सदस्यांनी भाग घेतला. संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी सर्व सदस्यांचे ऑनलाईन बैठकीत भाग घेतल्याबद्दल आभार मानले.

मागील जूनमध्ये नियोजित असलेली श्री. मनोहर पर्रीकर स्मृती गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धा जगव्यापी कोरोना विषाणू महामारीमुळे रद्द करावी लागली. आता गोवा बुद्धिबळ संघटनेने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा घेण्याचे ठरविले आहे. कोविडमुळे रद्द झालेली ग्रँडमास्टर स्पर्धा कधी घ्यायची याबाबत बैठकीत निर्णय होऊ शकला नाही. देशातील आणि जगभरातील कोविड-१९ विषयक परिस्थिती निवळल्यानंतरच गोवा ग्रँडमास्टर स्पर्धा होऊ शकते.

बाराही तालुक्यात ऑनलाईन स्पर्धा

राज्यातील बुद्धिबळपटूंसाठी सर्व १२ तालुका पातळीवर अखिल गोवा ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा खेळविण्याचा निर्णय गोवा बुद्धिबळ संघटनेने घेतला आहे. ही लीग पद्धतीची स्पर्धा प्रत्येक तालुका संघटना आयोजित करेल. सर्व बाराही स्पर्धा झाल्यानंतर विजेत्याची घोषणा होईल. या ऑनलाईन लीग स्पर्धेचे लवकरच वेळापत्रक जाहीर होईल.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या