ईस्ट बंगालच्या प्रशिक्षकपदी गोमंतकीय

किशोर पेटकर
शुक्रवार, 31 जुलै 2020

आगामी फुटबॉल मोसमासाठी फ्रान्सिस कॉस्ता यांची नियुक्ती

पणजी

भारतीय फुटबॉलमधील नावाजलेला संघ कोलकात्यातील ईस्ट बंगालने आगामी मोसमासाठी गोव्याचे फ्रान्सिस जुझे ब्रुतो दा कॉस्ता यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. ते स्पॅनिश मारियो रिव्हेरा यांची जागा घेतील.

फ्रान्सिस यांच्या नियुक्तीची माहिती ईस्ट बंगालने सोशल मीडियाद्वारे दिली. फ्रान्सिस मडगाव येथील असून ३८ वर्षांचे आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी सालसेत एफसी संघाचे प्रशिक्षकपद सांभाळल्यानंतरत्यांनी २००४ पासून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या एलिट अकादमीत १४१७१९ वर्षांखालील वयोगट संघाचे प्रशिक्षक या नात्याने जबाबदारी पेलली आहे. त्यापूर्वी ते साळगावकर एफसीच्या युवा विकास कार्यक्रमाचे प्रमुख होते.

इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत २०१६ साली त्यांनी गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेड संघाचे सहाय्यक प्रशिक्षक या नात्यानेही काम पाहिले होते. तेव्हा पोर्तुगालचे नेलो व्हिंगाडा त्या संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. नंतर व्हिंगाडा २०१७ मध्ये मलेशियाच्या राष्ट्रीय संघाचेतसेच २०१९ मध्ये आयएसएलमधील केरळा ब्लास्टर्सचे प्रशिक्षक असताना फ्रान्सिस त्यांचे सहाय्यक होते. २००८ साली गोव्याच्या या फुटबॉल मार्गदर्शकाने प्रशिक्षणात एएफसी अ परवाना मिळविला. ते एएफसी प्रो-लायसन्सधारक प्रशिक्षकही आहेत.

भारतीय फुटबॉलमधील श्रीमंत परंपरा असलेला ईस्ट बंगाल हा आदर असलेला संघ आहे. या संघासोबत जोडणे आपल्यासाठी भाग्याचे आणि आभिमानास्पद असल्याचे मत फ्रान्सिस यांनी व्यक्त केले आहे. 

गतमोसमातील आय-लीग स्पर्धेत ईस्ट बंगालने १६ सामन्यांतून २३ गुणांची कमाई करत विजेत्या मोहन बागान (३९ गुण) संघानंतर दुसरा क्रमांक मिळविला होता. यंदाही ते आय-लीग स्पर्धेत असून आयएसएल स्पर्धेत खेळण्यासाठीही प्रयत्नशील आहेत.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या