गोव्यातील फुटबॉल प्रतीक्षा यादीत

Dainik Gomantak
सोमवार, 15 जून 2020

येत्या ऑगस्टपासून नवा मोसम सुरू होण्याची शक्यता अंधूक

पणजी

 कोविड-१९ मुळे गोव्यातील फुटबॉल प्रतीक्षा यादीत आहे. कोरोना विषाणू बाधितांची राज्यातील संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे, त्या पार्श्वभूमीवर गोवा फुटबॉल असोसिएशनचा (जीएफए) नवा मोसम येत्या ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता अंधूक आहे.

प्रत्येक वर्षी गोव्यातील मोसम मदतनिधी सामन्याने ऑगस्टच्या मध्यास सुरू होतो आणि सप्टेंबरपासून प्रो-लीग स्पर्धा खेळली जाते. तसेच जीएफएचे संलग्न क्लब जुलै-ऑगस्ट कालावधीत आंतरग्राम स्पर्धा आयोजित करतात. मे महिन्यापासून क्लब नोंदणी शुल्क, खेळाडू नोंदणी याद्वारे मोसमपूर्व प्रक्रिया सुरू होते. प्राप्त माहितीनुसार, यंदा नोंदणी शुल्क प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही. विशेष बाब म्हणजे, २० जानेवारी २०२० नंतर जीएफएच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक झालेली नाही. त्यामुळे संबंधित प्रतीक्षेत आहेत.

जीएफएचे उपाध्यक्ष लव्हिनियो रिबेलो यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सध्याची परिस्थिती अनुकूल नाही. सारे काही पूर्वपदावर आल्यानंतर राज्यातील फुटबॉल सूरळीत होईल. गोव्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आणि साथ पसरत चालली आहे, त्यामुळे आंतरग्राम स्पर्धांत गर्दी टाळण्यासाठी या स्पर्धांना परवानगी देणे चुकीचे असेल, असे रिबेलो यांना वाटते.

दरम्यान, जीएफए व्यवस्थापकीय समितीच्या काही सदस्यांनी बैठकीची मागणी केली आहे. बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव जीएफएचे अध्यक्ष आहेत. 

गतमोसम अपूर्ण

जीएफएचा २०१९-२० मोसम अपूर्ण आहे. कोरोना विषाणू महामारीच्या देशव्यापी फैलावामुळे, तसेच लॉकडाऊन लागू झाल्याने २० मार्चनंतर गोव्यात एकही फुटबॉल सामना झालेला नाही. प्रो-लीग फुटबॉल स्पर्धा अपूर्ण असून विजेता निश्चित झालेला नाही. गतमोसमात अपूर्ण राखून, २०२०-२१ मोसम सुरू केला जाईल का याबाबतही अनिश्चितता आहे. नव्या मोसमाबाबत जीएफएचे पदाधिकारीच अनभिज्ञ आहेत. प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या संघांनीही अजून खेळाडू नोंदणी, सराव आदी बाबींचे नियोजन केलेले नाही. गतमोसम अपूर्ण असल्यामुळे प्रो-लीगमधील पदावनती झालेली नाही, प्रथम विभागीय स्पर्धा झाली नसल्याने पदोन्नती मिळणारा संघही निश्चित झालेला नाही. मात्र जीएफए व्यवस्थापकीय समितीची बैठक झालेली नसल्यामुळे सध्यातरी सारे अस्पष्टच आहे.

राष्ट्रीय मोसम १ ऑगस्टपासून

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) फिफाच्या मान्यतेने २०२०-२१ मोसमाचे नियोजन केले असून त्यानुसार, मोसमास १ ऑगस्ट २०२० रोजी सुरवात होईल आणि ३१ मे २०२१ रोजी समाप्ती होईल. या संदर्भात एआयएफएफने ९ जून रोजी साऱ्या संलग्न संघटनांना परिपत्रक पाठविले आहे. खेळाडू नोंदणीचा पहिला टप्पा या वर्षी १ ऑगस्ट ते २० ऑक्टोबर या कालावधीत, तर दुसरा टप्पा पुढील वर्षी १ ते ३१ जानेवारी या कालावधीत असेल.

संबंधित बातम्या