गोव्याचा मास्टर बुद्धिबळपटू लिऑन मेंडोसा स्लोव्हाकियात विजेता

क्रीडा प्रतिनिधी
बुधवार, 2 सप्टेंबर 2020
गोव्याचा चौदा वर्षीय प्रतिभावान इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू लिऑन मेंडोसा याने स्लोव्हाकियातील बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले. स्कालिकी बुद्धिबळ महोत्सवात त्याने अपराजित राहताना नऊपैकी साडेसात गुण प्राप्त केले.

पणजी: गोव्याचा चौदा वर्षीय प्रतिभावान इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू लिऑन मेंडोसा याने स्लोव्हाकियातील बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले. स्कालिकी बुद्धिबळ महोत्सवात त्याने अपराजित राहताना नऊपैकी साडेसात गुण प्राप्त केले.

लिऑनचे सध्या फिडे मानांकनात २४७२ एलो गुण आहेत. स्लोव्हाकियातील स्पर्धेत त्याने आपल्यापेक्षा सरस खेळाडूंवर मात केली. त्याने सहा डाव जिंकले, तर तीन डाव बरोबरीत राखले. जवळच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा त्याने अर्धा गुण जास्त नोंदविला. लिऑनने २६०० एलो गुण असलेल्या इटलीच्या पिएर लियुजी बोस्सो याच्यावर मिळविलेला विजय उल्लेखनीय ठरला. याशिवाय मारेक प्नियासेक (पोलंड), आलेक्झांडर स्काल्स्की (चेक प्रजासत्ताक), मार्सिन मोलेंडा (पोलंड), थॉमस दिओनिसी (फ्रान्स), हॅरी ग्रीव्ह (इंग्लंड) या खेळांडूवर मात केली.

सध्या युरोपात असलेल्या लिऑनने लवकरच ग्रँडमास्टर बनण्याचे लक्ष्य राखले आहे. स्लोव्हेकियातील कामगिरीने आपण अतिशय आनंदित असून मानांकन वाढविण्याचे आणि लवकरच ग्रँडमास्टर बनण्याची आशा राखून आहे, अशी प्रतिक्रिया लिऑन याने दिली.  

या वर्षी फेब्रुवारी लिऑन मॉस्को येथील एरोफ्लोट खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर हंगेरीतील बुडापेस्ट येथे स्पर्धा खेळण्यास गेला होता, पण कोरोना विषाणू महामारी लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प झाल्यामुळे तो तेथेच वडिलांसह अडकून पडला. लॉकडाऊनमुळे युरोपात राहावे लागल्यानंतर ग्रँडमास्टर नॉर्मसाठी प्रयत्नशील राहत त्याने तेथील स्पर्धांत भाग घेणे सुरू केले. जूनमध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या बालाटॉन चेस फेस्टिव्हलमध्ये तो विजेता ठरला. त्यानंतर जुलैमध्ये सर्बियात झालेल्या पारासिन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत त्याला दुसरा क्रमांक मिळाला.

संबंधित बातम्या