भारताच्या दृष्टिबाधित क्रिकेट संघात गोव्याचा अक्षय

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 24 मार्च 2021

दृष्टिबाधित क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात गोव्याच्या अक्षय बोरीकर याची निवड झाली आहे.

पणजी : बांगलादेशमधील ढाका येथे दोन एप्रिलपासून खेळल्या जाणाऱ्या तीन देशांच्या दृष्टिबाधित क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात गोव्याच्या अक्षय बोरीकर याची निवड झाली आहे. या स्पर्धेत भारतासह यजमान बांगलादेश व पाकिस्तान हे अन्य संघ आहेत.

भारतीय संघाचे सराव शिबिर गुरुवारपासून कोलकाता येथे सुरू होत असून त्यासाठी अक्षय रवाना झाला आहे. भारतीय संघातील निवडीपर्यंतच्या वाटचालीत गोवा दृष्टिबाधित क्रिकेट संघटनेचे महत्त्वपूर्ण प्रोत्साहन मिळाले असून त्याबद्दल आभारी असल्याचे अक्षयने सांगितले. गोव्याच्या दृष्टिबाधित क्रिकेट संघाचे कर्णधार यशवंत नागेशकर यांनी आपले क्रिकेट विकसित करण्यात आणि उत्कृष्ट खेळाडू बनण्यात मोलाचा वाटा उचलला असल्याचे अक्षयने नमूद केले. गोवा दृष्टिबाधित क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष दया पागी यांचे चांगले सहकार्य लाभले. त्यांनी सराव आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भरपूर प्रयत्न आणि मदत केली, असे अक्षय याने सांगितले. त्याने गोवा क्रिकेट असोसिएशनप्रतीही आभार व्यक्त केले आहे. (Goas Akshay in India visually impaired cricket team)

शार्दुल, प्रसिद्ध कृष्णा व भुवी बद्दल वीरूचे भन्नाट ट्विट होतंय चांगलचं व्हायरल...

जीसीएचे माजी अध्यक्ष चेतन देसाई यांच्या पाठबळामुळे भारतीय दृष्टिबाधित क्रिकेट संघापर्यंत मजल मारू शकलो असे अक्षयने आवर्जून नमूद केले. बँक ऑफ इंडियात अधिकारी असलेल्या अक्षयला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बँकेकडून विशेष कार्य गटातील रजा मंजूर करण्यात आली आहे, नेहमीच प्रोत्साहन दिल्याबद्दल त्याने बँक ऑफ इंडियासही धन्यवाद दिले आहेत.

सुरवातीस अक्षयला दृष्टिदोष नव्हता, 2010 साली तो दृष्टिबाधित बनला. त्यानंतर हिंमत न हारता त्याने 2012 पासून दृष्टिदोषांचे क्रिकेट खेळण्यास सुरवात केली. 2014 साली त्याची सर्वप्रथम गोव्याच्या दृष्टिबाधित क्रिकेट संघात निवड झाली. तेव्हापासून तो सातत्यने गोव्याचे प्रतिनिधित्व करत असून पश्चिम विभागीय, तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत खेळला आहे. यावर्षी झालेल्या दृष्टिबाधितांच्या राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धेत अक्षय बी1 गटात मालिकावीर ठरला होता. दृष्टिबाधितांच्या अकरा सदस्यीय क्रिकेट संघात बी1, बी1, बी1 गटातील खेळाडू असतात.

संबंधित बातम्या