गोव्याचे बांदेकर दुसऱ्या टर्मसाठी रिंगणात

Dainik Gomantak
शुक्रवार, 12 जून 2020

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या खजिनदारपदासाठी उमेदवारी

पणजी

गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या (एआयसीएफ) खजिनदारपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महासंघाच्या मावळत्या व्यवस्थापकीय समितीतही ते या पदी होते.

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाची निवडणूक प्रक्रिया सध्या न्यायालयीन कक्षेत आहे. कोविड-१९ महामारीमुळे मद्रास उच्च न्यायालयाचे कामकाज स्थगित आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर, न्यायलयीन कामकाज सुरू होऊन महासंघाच्या निवडणुकीविषयी निकाल अपेक्षित आहे, असे किशोर बांदेकर यांनी सांगितले. महासंघात सध्या दोन गट असून निवडणूक वाद निवाड्यासाठी न्यायालयात आहे. २०१७-२०२० या कालावधीतील महासंघाच्या व्यवस्थापकीय समितीत बांदेकर यांनी खजिनदारपद भूषविले आहे.

गोव्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या अध्यक्षतेखालील गोवा बुद्धिबळ संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीत बांदेकर दुसऱ्यांदा सचिव आहेत. यापूर्वी २०१३-२०१७ या कालावधीत ते संघटनेचे सचिव होते. सध्याच्या समितीचा कार्यकाळ २०२१ साली संपेल. बांदेकर यांच्या कार्यकाळात २०१८ पासून गोव्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खुली ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा खेळली जात आहे. शिवाय राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा गोव्यात झाल्या आहेत. पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या बांदेकर यांनी गोवा बुद्धिबळ संघटनेत व्यवस्थापकीय समिती सदस्य, उपाध्यक्ष, खजिनदार या पदांवरही काम केले आहे. ते फिडेचे मान्यताप्राप्त आर्बिटर असून राष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळपटू या नात्याने गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे.

संबंधित बातम्या