गोव्याचे माजी बॅडमिंटनपटू आशुतोष नौदलात कॅप्टन

किशोर पेटकर
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

बॅडमिंटनव्यतिरिक्त आशुतोष भारतातील अव्वल रॅकेटलॉन (बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिस, स्क्वॉश एकत्रित) खेळाडू आहेत.

पणजी

गोव्याचे माजी बॅडमिंटनपटू आशुतोष पेडणेकर नौदलात कॅप्टन बनले आहेत. नव्वदच्या दशकात त्यांनी आणि त्यांची बहीण लीना पेडणेकर यांनी गोमंतकीय बॅडमिंटन कोर्ट गाजविले होते. ते गोव्याचे पुरुष गटातील माजी राज्य विजेते आहेत.

मुंबई येथे भारतीय नौदलात कार्यरत असलेले आशुतोष कमांडरपदी होते, त्यांना आता बढती मिळाली आहे. ते सध्या ४८ वर्षांचे असून राष्ट्रीय पातळीवरील मास्टर्स बॅडमिंटनमध्ये सक्रिय आहेत. ४५ वर्षांवरील व्हेटरन गटात ते राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख मानांकित बॅडमिंटनपटू आहेत. गेल्या वर्षी गोव्यात झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आशुतोष यांनी मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते.

बॅडमिंटनव्यतिरिक्त आशुतोष भारतातील अव्वल रॅकेटलॉन (बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिस, स्क्वॉश एकत्रित) खेळाडू आहेत. या क्रीडा प्रकारात ते मास्टर्स गटातील जागतिक सुवर्णपदक विजेते आहेत. कॅप्टनपदी बढती मिळाल्याबद्दल आशुतोष यांचे गोवा बॅडमिंटन असोसिएशनने अभिनंदन केले आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या