गोव्यातील अनुभव विस्मयकारक असेल : रेडीम

Dainik Gomantak
शुक्रवार, 26 जून 2020

एफसी गोवाच्या भावनाप्रवण चाहत्यांसमोर खेळण्यास उत्सुक

पणजी

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यात एफसी गोवा संघ खेळत असताना या संघाच्या भावनाप्रवण चाहत्यांचा जल्लोष विस्मयकारक असतो, तो अनुभव आता संघातील नवा खेळाडू रेडीम ट्लांग याला घ्यायचा आहे.

मेघालयातील शिलाँग येथे फुटबॉलचे धडे गिरवलेल्या २५ वर्षीय रेडीम याला एफसी गोवा संघाने आगामी मोसमासाठी करारबद्ध केले आहे. आयएसएल स्पर्धेत अगोदर गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेडकडून खेळलेल्या या गुणवान विंगरने एफसी गोवाकडून खेळण्याविषयी भावना व्यक्त केल्या.

रेडीमने सांगितले, की ‘‘एफसी गोवाचा भाग बनतोय हे माझ्यासाठी आनंददायी आहे. मी एफसी गोवाचा प्रशंसक आहे. हा माझ्या आयुष्यातील एक सर्वोत्तम क्षण आहे. नॉर्थईस्ट युनायटेडसोबतचा काळाचा मी आनंद लुटला. आता येथे भारतीय फुटबॉलमधील मोठा बहुमान मिळविण्याच्या आव्हानासाठी रोमांचित झालो आहे. गोव्यात भावनाप्रवण फुटबॉल चाहत्यांसमोर आणि देशातील काही उत्कृष्ट फुटबॉलसमवेत खेळण्याचा अनुभव विस्मयकारक असेल. मी प्रतीक्षा ताणू शकत नाही.’’

 मेहनत हेच बलस्थान

नॉर्थईस्ट युनायटेडसोबतच्या दोन वर्षांच्या काळात खेळाडू या नात्याने मैदानावर आणि मैदानाबाहेरही विकसित होण्यावर भर दिल्याचे रेडीमने कबूल केले. आता पुढे एफसी गोवासमवेत त्याला आणखी प्रगती साधायची आहे. आपण मेहनतीला कधीच विसरलो नाही आणि कधीही हार मानायची नाही हे आपले प्रमुख बलस्थान असल्याचे त्याने नमूद केले. ‘‘मला काम, काम आणि काम करायचे आहे,’’ असे तो आत्मविश्वासाने म्हणाला.

 फुटबॉल पाहण्याचा आनंद

लहान असताना शिलाँग लाजाँग आणि एअर इंडिया यांच्यातील आय-लीग सामना पाहून आपण प्रेरित झालो. भरगच्च स्टेडियमवर पालकांसमवेत फुटबॉल पाहण्याचा आनंद अफलातून होता. त्याचक्षणी फुटबॉलपटूच बनण्याचे निश्चित केले होते, असे मनोगत रेडीमने व्यक्त केले. २००२ मधील विश्वकरंडक गाजविलेला ब्राझीलचा रोनाल्डो नाझारियो, त्याच देशाचा रिकार्डो काका, पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांना रेडीम आपले आदर्श मानतो. मध्यफळीत आपण ज्या जागी खेळतो, त्याच जागी काका खेळ असे याचा त्याला अभिमान आहे.

 ‘‘मला आयएसएल किताब जिंकायचा आहे. ज्या तऱ्हेने एफसी गोवा संघ खेळतो ते पाहणे आनंददायी असते. येथे मला इतर खेळाडू आणि मुलांसाठी प्रेरणादायी व्हायचं आहे.’’

- रेडीम ट्लांग, एफसी गोवाचा खेळाडू

संबंधित बातम्या