गोव्याचा रणजी क्रिकेटपटू रीगनच्या हाती पुन्हा टेबल टेनिस रॅकेट

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

गोव्याचा रणजी क्रिकेटपटू रीगन पिंटो याने बॅट-बॉलऐवजी पुन्हा टेबल टेनिस रॅकेट हाती घेतले आहे. दीड दशकभरापूर्वी त्याने क्रिकेटसाठी टेबल टेनिस त्यागले होते, आता तो फिरून एकदा जुन्या खेळाकडे वळला आहे.

पणजी : गोव्याचा रणजी क्रिकेटपटू रीगन पिंटो याने बॅट-बॉलऐवजी पुन्हा टेबल टेनिस रॅकेट हाती घेतले आहे. दीड दशकभरापूर्वी त्याने क्रिकेटसाठी टेबल टेनिस त्यागले होते, आता तो फिरून एकदा जुन्या खेळाकडे वळला आहे. लहानपणी रीगन क्रिकेट आणि टेबल टेनिस या दोन्ही खेळात तरबेज होता. ज्युनियर पातळीवरील स्पर्धात्मक टेबल टेनिस व क्रिकेट तो नियमित खेळत असे. राज्य टेबल टेनिस गाजविताना त्याने ज्युनियर गटात अव्वल कामगिरी केली होती, तसेच सीनियर गटातही ठसा उमटविला होता.

वयोगट क्रिकेटमध्ये दर्जेदार लेगस्पिनर आणि प्रभावी फलंदाज अशी अष्टपैलू चमक रीगनने दाखविली. क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्यासाठी त्याने स्पर्धात्मक टेबल टेनिसपासून दूर होण्याचे ठरविले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वयोगट क्रिकेट स्पर्धेत रीगनने गोव्याचे १९ वर्षांखालील गटात नेतृत्वही केले होते. नंतर गोव्याच्या सीनियर संघात स्थान मिळविताना त्याने फलंदाजीवर जास्त लक्ष केंद्रित केले.

रीगनने 2009 मध्ये रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले. नंतर ऑक्टोबर 2017 मध्ये शेवटचा रणजी सामना खेळला, त्यानंतर तो गोव्याच्या संघातून बाहेर गेला. त्याने 31 रणजी सामन्यात 3 शतके व 7 अर्धशतकांच्या मदतीने 32.55च्या सरासरीने 1400 धावा केल्या, तसेच 9 विकेट टिपल्या. आता या 29 वर्षीय खेळाडूने टेबल टेनिसकडे मोर्चा वळविला आहे. सोमवारपासून हरियानातील पंचकुला येथे सुरू झालेल्या 82व्या राष्ट्रीय सीनियर टेबल टेनिस स्पर्धेत तो गोव्याचे प्रतिनिधित्व करत असून दीर्घ कालावधीनंतर तो राष्ट्रीय स्पर्धेत खेळत आहे.

संबंधित बातम्या