गोव्याच्या संजनाचे दुबईत विक्रमी जलतरण

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 मे 2021

संजनाने 100 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत अव्वल वेळ नोंदविताना यूएई जलतरणात नवी विक्रमी कामगिरी बजावली. 

पणजी: गोव्याची युवा जलतरणपटू संजना प्रभुगावकर (Sanjana Prabhugaonkar) हिने हल्लीच संयुक्त अरब अमिरातीतील (Arab Amirat) (यूएई) जलतरण स्पर्धेत विक्रमी कामगिरी नोंदवत पदकप्राप्ती केली. या चौदा वर्षीय प्रतिभाशाली जलतरणपटूने पहिल्या अॅपेक्स कम्युनिटी खुल्या जलतरण स्पर्धेत चार सुवर्ण व एका रौप्यपदकाची कमाई केली. दुबई येथील अॅक्वा नेशन स्पोर्टस अकादमीची प्रशिक्षणार्थी या नात्याने संजनाला या स्पर्धेत भाग घेण्याची संधी लाभली. त्यात संजनाने 100 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत अव्वल वेळ नोंदविताना यूएई जलतरणात नवी विक्रमी कामगिरी बजावली.  (Goas Sanjanas record breaking swimming in Dubai)

दुबईतील हमदान तरण तलाव क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत संजनाने 100 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीसह  200 मीटर वैयक्तिक मेडली, 200 मीटर बॅकस्ट्रोक आणि 50 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक प्राप्त केले. 200 मीटर फ्रीस्टाईलमध्ये तिला रौप्यपदक मिळाले. 

AFC Champions League: मेहनती मार्टिन्सकडून चांगल्या कामगिरीचा फेरांडोंना विश्वास

दुबईत सरावास प्राधान्य

देशात सध्या कोरोना विषाणू महामारीमुळे जलतरण `लॉक` आहे. अशा परिस्थितीत संजनाने दुबईत पूर्णवेळ सरावास प्राधान्य देत कामगिरी उंचावण्यावर भर दिला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते नावाजलेले जलतरण प्रशिक्षक प्रदीप कुमार यांचे संजनाला मार्गदर्शन लाभत आहे. दुबईतील स्विस इंटरनॅशनल सायंटिफिक स्कूल येथील स्पोर्टस अँड एन्डुरन्स ट्रेनिंग अकादमीत प्रदीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संजना सराव करत आहे. ती गोव्याची वयोगट पातळीवरील अव्वल जलतरणपटू आहे. तिने गोव्याचे राष्ट्रीय पातळीवरील वयोगट, तसेच शालेय जलतरण स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. नवव्या इयत्तेतील विद्यार्थिनी असलेली पणजीतील संजना गेली नऊ वर्षे गोव्यातील नियमित जलतरणपटू असून गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या तरण तलाव संकुलातील प्रशिक्षणार्थीही आहे.

विराट कोहली नाही तर ''या'' कर्णधाराला मिळते सर्वाधिक वेतन

दिगंबर कामत यांच्याकडून कौतुक

गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी संजनाच्या विक्रमी आंतरराष्ट्रीय कामगिरीचे कौतुक केले आहे. ते गोवा जलतरण संघटनेचे अध्यक्षही आहेत. चार सुवर्ण व एक रौप्यपदक विजेत्या संजनाची कामगिरी भूषणावह असल्याचे कामत यांनी नमूद केले असून तिचे प्रशिक्षक, पालक व शुभचिंतकांनाही श्रेय दिले आहे.

दृष्टिक्षेपात जलतरणपटू संजनाची कामगिरी

- संयुक्त अरब अमिरातीतील अॅपेक्स कम्युनिटी जलतरण स्पर्धेत 4 सुवर्ण, 1 रौपायपदक

- राज्य पातळीवरील स्पर्धेत 11 नवे स्पर्धा विक्रम, दुबईतील स्पर्धेत 1 स्पर्धा विक्रम

- आतापर्यंत राज्यस्तरीय-राष्ट्रीय पातळीवरील जलतरणात 92 सुवर्ण, 28 रौप्य व 13 ब्राँझपदके

- राज्य व राष्ट्रीय पातळीवर 9 वेळा वैयक्तिक विजेतेपदाचा करंडक

- 2020 साली खेलो इंडिया युवा स्पर्धेत 13व्या वर्षी सहभागी, 17 वर्षांखालील गटातील सर्वांत युवा जलतरणपटू  

- 2019 साली राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटात 2 रौप्य, 1 ब्राँझपदक

- पुण्यास झालेल्या राष्ट्रीय सबज्युनियर जलतरणात 12 वर्षांखालील वयोगटात 3 ब्राँझपदके
 

संबंधित बातम्या