गोव्याचा शेनॉन पोर्तुगालमध्ये खेळणार

Dainik Gomantak
शनिवार, 6 जून 2020

लिस्बनमधील क्लुब देस्पोर्तिव्हो दो ऑलिव्हेज ई मॉस्काव्हिदशी करार

पणजी

गोव्याचा युवा फुटबॉलपटू शेनॉन व्हिएगस पोर्तुगालमधील क्लबकडून खेळणार आहे. स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाच्या या आघाडीपटूस लिस्बनस्थित `क्लुब देस्पोर्तिव्हो दो ऑलिव्हेज ई मॉस्काव्हिद`ने करारबद्ध केले आहे.

क्लुब देस्पोर्तिव्हो दो ऑलिव्हेज ई मॉस्काव्हिद संघ लिस्बनमधील खालच्या श्रेणीतील द्वितीय विभागीय स्पर्धेत खेळतो. शेनॉन यापूर्वी भारताकडून खेळला असून त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे १६ वर्षांखालील वयोगटात प्रतिनिधित्व केले आहे.

शेनॉन नोव्हेंबर २०१८ मध्ये इंटरनॅशनल फुटबॉल अकादमी द पोर्तुगालमध्ये रुजू झाला. गोव्यातील वास्को स्पोर्टस क्लबचे माजी प्रशिक्षक एल्विस गोएश या अकादमीचे संस्थापक आणि तांत्रिक संचालक आहे. गोएश यांच्या अकादमीत शेनॉनला चांगली संधी लाभली. तेथे त्याने चाचणीत क्लुब देस्पोर्तिव्हो संघाच्या प्रशिक्षकांचे लक्ष वेधले. मात्र वयाची १८ वर्षे पूर्ण न झाल्यामुळे त्याला तेथे व्यावसायिक करार करणे शक्य झाले नाही. या वर्षी जानेवारीत त्याने १८वा वाढदिवस साजरा केला. तो ६.२ फूट उंच असल्यामुळे त्याला आघाडीफळीत खेळताना उंचीचा लाभ मिळतो.

``शेनॉनला युरोपमध्ये खेळताना पाहायचे माझे स्वप्न आहे. स्पोर्टिंग क्लब द गोवाचे अध्यक्ष पीटर वाझ यांच्यामुळे आता ते प्रत्यक्षात येत आहे. ते आमच्यासाठी मोठे प्रेरणास्त्रोत आहेत,`` असे शेनॉनचे वडील मायकल यांनी सांगितले. गतमोसमात शेनॉनने एआयएफएफच्या १८ वर्षांखालील एलिट लीग स्पर्धेत स्पोर्टिंग क्लबचे प्रतिनिधित्व केले आहेशिवाय या संघाकडून तो गोवा प्रो-लीगमधील काही सामन्यांतही खेळला.

 भारताचे वयोगटात प्रतिनिधित्व

वयाच्या आठव्या वर्षापासून शेनॉन स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाच्या ग्रासरूट कार्यक्रमाशी जोडला गेला. शालेय पातळीवर त्याने पणजीच्या डॉन बॉस्को हायस्कूलचे प्रतिनिधित्व केले. २०१७ साली तो एआयएफएफच्या अकादमीत दाखल झाला. त्या वर्षी त्याने नेपाळमध्ये झालेल्या १५ वर्षांखालील सॅफ करंडक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. नंतर गोव्याचेच बिबियान फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली तो भारताच्या १६ वर्षांखालील संघातून खेळला.

 

संबंधित बातम्या