गोव्याच्या शिखाची होणार अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

dainik gomantak
बुधवार, 13 मे 2020

``मी कधीही पुरस्कारांसाठी खेळले नाही. मी पुरस्काराने सन्मानित झाले, तर धन्य होईन.`` - शिखा पांडे

पणजी,

गोव्याची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू शिखा पांडे हिची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दीप्ती शर्मा हिच्यासह अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्याचे ठरविले आहे.

शिखाला अर्जुन पुरस्कार मिळण्यावर केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने शिक्कामोर्तब केल्यास हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविणारी ती गोव्याची तिसरी क्रीडापटू ठरेल. यापूर्वी दोन्ही वेळेस गोमंतकीय फुटबॉलपटू अर्जुन पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. गोलरक्षक ब्रह्मानंद शंखवाळकरला १९९७ मध्ये, तर आघाडीपटू ब्रुनो कुतिन्हो याला २००१ साली अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

प्राप्त माहितीनुसार, बीसीसीआयने यावर्षीच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिखा आणि दीप्ती यांची शिफारस करण्याचे निश्चित केले आहे. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत उपविजेतेपद मिळविले होते. भारताच्या या वाटचालीत शिखा व दीप्ती यांनी मोलाची भूमिका बजावली होती. नव्या चेंडूने वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना शिखाने ५ सामन्यांतून ७ विकेट्स मिळविल्या होत्या.

शिखाने २०१४ साली भारतीय महिला क्रिकेट संघात पदार्पण केले. तिने दोन कसोटींत ४ विकेट्स, ५२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत ७३ विकेट्स, तर ५० टी-२० सामन्यांत ३६ विकेट्स मिळविल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने दोन अर्धशतकेही नोंदविली आहेत.

``लहानपणापासून स्वप्ने पाहिली. त्यापैकी सेनादलात भरती होऊन देशसेवेचे आणि भारतीय क्रिकेट संघातून खेळण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले.`` असे शिखा मागे म्हणाली होती.

दृष्टिक्षेपात क्रिकेटपटू शिखा पांडे

- वयाच्या १७व्या वर्षी गोव्याच्या सीनियर क्रिकेट संघात पदार्पण

- गोव्याच्या एकदिवसीय, टी-२० संघाची कर्णधार, हुकमी अष्टपैलू

- गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०१० साली अभियांत्रिकी पदवी

- २०१२ मध्ये भारतीय हवाई दलात रुजू, त्यापूर्वी प्रशिक्षणासाठी एक वर्ष क्रिकेटपासून दूर

- ९ मार्च २०१४ रोजी बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

- २०१७ मध्ये महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत उपविजेती

- २९ ऑगस्ट २०१८ रोजी गोवा सरकारच्या दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्काराने सन्मानित

- एकूण ३ टी-२० विश्वकरंडक स्पर्धांत भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व, २०२० मध्ये उपविजेती

- वेगवान गोलंदाजीत कसोटीत ४, वन-डेत ७३, टी-२० क्रिकेटमध्ये ३६ विकेट्स

- संकलन किशोर पेटकर

संबंधित बातम्या