गोव्याच्या शिखा पांडेचे दुसऱ्यांदा भारतीय महिला क्रिकेट संघात पुनरागमन

गोव्याच्या शिखा पांडेचे दुसऱ्यांदा भारतीय महिला क्रिकेट संघात पुनरागमन
Goas Shikha Pandey returns to Indian womens cricket team for the second time

पणजी: गोव्याच्या (Goa) महिला क्रिकेट संघाची कर्णधार शिखा पांडे (Shikha Pandey) हिने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दुसऱ्यांदा भारतीय संघात (Indian Team) पुनरागमन केले आहे. पुढील महिन्यातील इंग्लंडच्या दौऱ्यासाठी तिला कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघात स्थान मिळाले आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यात एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळेल. एकमेव कसोटी सामन्यात 16 जूनपासून, तर दौऱ्यातील शेवटचा टी-20 सामना 15 जुलै रोजी खेळला जाईल. कसोटी आणि एकदिवसीय लढतीत मिताली राज, तर टी-20 मालिकेत हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करेल. (India Tour of England: Goa's Shikha Pandey makes comeback to international squad)

यावर्षी मार्च महिन्यात मायदेशी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी अनुभवी शिखाला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. यापूर्वी शिखाला 2018 साली विंडीजमध्ये झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते, त्यानंतर तिने जोरदार पुनरागमन केले होते. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शिखा उपविजेतेपद मिळविलेल्या भारतीय संघाची प्रमुख गोलंदाज होती. तिने स्पर्धेत 7 विकेट मिळविल्या होत्या.

भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर शिखाने गेल्या मार्चमध्ये झालेल्या सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत चांगला फॉर्म प्रदर्शित केला होता. गोव्याचे नेतृत्व करताना जयपूर येथे झालेल्या एलिट क गट स्पर्धेतील पाच सामन्यांत तिने सहा विकेट टिपल्या, तसेच 116 धावा केल्या होत्या.

उल्लेखनीय कारकीर्द

वेगवान गोलंदाज आणि फलंदाजीत उपयुक्त असलेली शिखा 32 वर्षांची आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकार मिळून तिने एकूण 113 विकेट मिळविल्या आहेत. 2014 साली भारतीय संघात पदार्पण केल्यापासून ती दोन कसोटी, 52 एकदिवसीय, तर 50 टी-20 सामने खेळली आहे. तिने कसोटीत चार, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 73, तर टी-20 प्रकारात 36 विकेट प्राप्त केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने दोन अर्धशतकांसह 507 धावाही केल्या आहेत.
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com