वेगवान गोलंदाजीत गोव्याची बाजू लंगडी

किशोर पेटकर
रविवार, 10 मे 2020

जीसीएतील सूत्रांच्या माहितीनुसार, गोव्याच्या रणजी संघातील सध्याच्या वेगवान गोलंदाजांबाबत फिजिओंचा अहवाल अनुकूल नाही.  गोलंदाज  पूर्णतः तंदुरुस्त नसल्याचा प्रतिकुल परिणाम त्यांच्या कामगिरीवर होतो.

पणजी,

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या मागील मोसमात वेगवान गोलंदाजी गोव्याची लंगडी बाजू असल्याचे स्पष्ट झाले. लक्षय गर्ग, फेलिक्स आलेमाव, विजेश प्रभुदेसाई, हेरंब परब यांचा मारा बोथट भासला. त्यामुळे गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) दर्जेदार वेगवान गोलंदाजाचा शोध सुरू केला आहे.

गतमोसमात प्लेट गटात अव्वल स्थान राखत गोव्याने एलिट गटासाठी पात्रता मिळविली आहे. गोव्याने कमजोर प्लेट गट संघावर वर्चस्व राखले, परंतु वेगवान गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. त्यामुळे लेगस्पिनर अमित वर्मा (१० सामन्यांत ४३ विकेट्स) व डावखुरा फिरकीपटू दर्शन मिसाळ (१० सामन्यांत ३० बळी) यांनी निर्णायक टप्प्यावर वेळोवेळी विकेट्स मिळविल्यामुळे गोव्याला प्लेट गटात अपराजित राहणे शक्य झाले.

जीसीएतील सूत्रांच्या माहितीनुसार, गोव्याच्या रणजी संघातील सध्याच्या वेगवान गोलंदाजांबाबत फिजिओंचा अहवाल अनुकूल नाही.  गोलंदाज  पूर्णतः तंदुरुस्त नसल्याचा प्रतिकुल परिणाम त्यांच्या कामगिरीवर होतो. ते मोठा स्पेल टाकू शकत नाहीत, तसेच कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरतात. सुरवातीचा स्पेल भेदक टाकल्यानंतर त्यांची दमछाक होते आणि ते गोलंदाजीतील दिशा व टप्पा हरवून बसतात. प्लेट गटातील संघ कमजोर आणि नवखे असल्यामुळे ही कमजोरी झाकोळली गेली, पण एलिट गटात मातब्बर संघाविरुद्ध तोकडी वेगवान गोलंदाजी साफ उघडी पडू शकते. त्यामुळेच जीसीएने वेगवान गोलंदाजाची चाचपणी सुरू केली आहे.

गतमोसमात वेगवान गोलंदाजीत फेलिक्स आलेमावचा पुद्दूचेरीविरुद्धच्या लढतीचा अपवाद वगळता विशेष जलवा दिसला नाही. पुद्दूचेरीविरुद्ध दोन्ही डावात मिळून १४५ धावांत ११ गडी बाद करणारा फेलिक्स विजयाचा शिल्पकार ठरला, पण त्याच्या गोलंदाजीतील दाहकतेचे सातत्य दिसले नाही.  फेलिक्सने मोसमात ३१ गडी बाद केले. नो-बॉलवर नियंत्रण नसलेल्या लक्षय गर्गने २०१८-१९ मोसमात ३७ विकेट्स मिळविल्या होत्या, पण गतमोसमात तो बळी मिळविण्यासाठी संघर्ष करताना दिसला. विजेश प्रभुदेसाईने टप्प्याटप्प्याने वेगवान गोलंदाजी केली, पण तो हुकमी गोलंदाज ठरू शकला नाही. युवा वेगवान गोलंदाज हेरंब परब पार निस्तेज ठरल्यामुळे गोव्याला गतमोसमात धक्का बसला. गतमोसमात सुयश प्रभुदेसाईच्या मध्यगती गोलंदाजीचा थोडाफार पार्ट टाईम या नात्याने वापर झाला होता.

 

परिणामकारक वेगवान पाहुणे

२०१८-१९ मोसमात आसामचा वेगवान गोलंदाज कृष्णा दास गोव्याकडून खेळला होता. त्याने ७ सामन्यांत २६ गडी बाद केले होते. त्यापूर्वी राजस्थानचा वेगवान गोलंदाज ऋतुराज सिंग गोव्याकडून २०१५ ते २०१८ या कालावधीत खेळला होता. त्याने १९ सामन्यांत ६२ विकेट्स मिळविल्या होत्या.

 

 

 

सौरभ, अविनाश सफल वेगवान

गोव्याकडून रणजी करंडक स्पर्धेत खेळताना वेगवान गोलंदाजीत सौरभ बांदेकर (६३ सामन्यांत १७० बळी) व अविनाश आवारे (२८ सामन्यांत १०३ बळी) हे जास्त सफल ठरले आहेत. याशिवाय रॉबिन डिसोझा (४३ सामन्यांत ९५ बळी), नारायण कांबळी (३९ सामन्यांत ७२ बळी), हर्षद गडेकर (२३ सामन्यांत ६७ बळी) या वेगवान गोलंदाजांनीही छाप पाडली आहे.

 

गतमोसमातील गोव्याची वेगवान गोलंदाजी

गोलंदाज सामने बळी सरासरी सर्वोत्कृष्ट

विजेश प्रभुदेसाई ८ २० २१.०५ ६-१४

फेलिक्स आलेमाव १० ३१ २७.५४ ६-७३

लक्षय गर्ग ९ १७ २८.६४ ४-३०

सुयश प्रभुदेसाई १० ४ ३१.०० २-३४

हेरंब परब ३ ५ ३५.२० २-३२

संबंधित बातम्या