गोव्यातील क्रीडा मोसम ‘कोरोना’मुळे लांबणीवर

गोव्यातील क्रीडा मोसम ‘कोरोना’मुळे लांबणीवर
Play ground

पणजी

कोविड-१९ महामारीचा राज्यातील स्पर्धाविषयक घडामोडींवर प्रतिकूल परिणाम झाला असून सर्व खेळांचे मोसम लांबणीवर पडले आहेत.

गोव्यात कोरोना विषाणू महामारीचा फैलाव वाढला आहे. रुग्णसंख्या आणि मृतांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. महामारीच्या राज्यस्तरीय आणि देशव्यापी फैलावामुळे क्रीडापटूंच्या आरोग्यास सर्वोच्च प्राधान्य देत गोव्यातील ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णयही राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. ही स्पर्धा २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत नियोजित होती.

दरवर्षी पावसाळ्यात गोव्यात इनडोअर खेळांचा स्पर्धा मोसम सुरू होतो. यंदा बॅडमिंटन आणि टेबल टेनिस संघटनेचे कोविड-१९ मुळे वार्षिक वेळापत्रक जाहीर केलेले नाही. राज्य प्रशासनानेही अजून स्पर्धा आयोजनास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे स्पर्धांचे वेळापत्रक खोळंबले आहे. मार्च महिन्यापासून बुद्धिबळ स्पर्धाही झालेल्या नाहीत. गोवा बुद्धिबळ संघटनेची .या वर्षीची स्व. श्री. मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय खुली ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धाही अधांतरी आहे. स्पर्धा २ ते ९ जून या कालावधीत होणार होती. जगातील कोविड-१९ परिस्थितीआंतरराष्ट्रीय प्रवास परवानगीवर या स्पर्धेचे भवितव्य अवलंबून आहे.

प्रत्येक मोसमात ऑगस्टच्या मध्यास सुरू होणारा राज्यस्तरीय फुटबॉल मोसम यंदा पुढे जाण्याचे निश्चित आहे. कोविड-१९ मुळे गोव्यात यंदा एकही आंतरग्राम फुटबॉल स्पर्धा झालेली नाही. दरवर्षी या स्पर्धा जून-जुलैच्या कालावधीत खेळल्या जातात. जीएफएच्या मोसमाच्या सुरवातीस दरवर्षी मदतनिधी सामना होतोयंदा त्याची अजून घोषणा झालेली नाही. सूत्राच्या माहितीनुसारऑक्टोबरपासून मोसम सुरू करण्याबाबत जीएफए चाचपणी करू शकतेत्यापूर्वी राज्यातील कोविड-१९ विषयक परिस्थिती सुधारणे आवश्यक असेल. इंडियन सुपर लीग (आयएसएल)तसेच आय-लीग फुटबॉल स्पर्धा एकाच राज्यात रिकाम्या स्टेडियममध्ये घेण्याचे नियोजन आहे. मात्र जीएफएने प्रो-लीग स्पर्धेबाबत अजून तसा विचार केलेला नाही. 

जीएफएचे अध्यक्ष आमदार चर्चिल आलेमाव यांनी काही दिवसांपूर्वीफुटबॉलपेक्षा जीवन जास्त महत्त्वाचे असल्याचे नमूद केले होते. साहजिकच ते घाईगडबडीत कोरोना विषाणूच्या उद्रेकात नवा मोसम सुरू करण्यात परवानगी देण्याची शक्यता कमीच आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जीएफएच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक जानेवारी २०२० नंतर झालेली नाही. यंदाचा राज्यस्तरीय फुटबॉल मोसम लांबणीवर पडल्यास गोवा प्रो-लीगतसेच अन्य वयोगट स्पर्धांचेही स्वरूप बदलण्याचे संकेत आहेत. 

जीएफएने २०१९-२० मोसमात आटोपल्याचे स्पष्ट केले असलेतरी प्रो-लीग विजेता जाहीर केलेला नाही. कोविड-१९ मुळे गतमोसमातील प्रथम विभागीय फुटबॉल स्पर्धा होऊ शकली नव्हती. जीएफएच्या विविध वयोगट स्पर्धाही अर्धवट राहिल्या होत्या. कोरोना विषाणूमुळे गोवा क्रिकेट असोसिएशनच्याही गतमोसमातील विविध स्पर्धा अपूर्ण राहिल्या. कोविड-१९ मुळे स्पर्धा घेण्याबाबत इतर खेळांच्या संघटनाही सावध आहेत.

संपादन - अवित बगळे

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com