IPL 2021 Auction : गोव्याच्या सुयशची इंडियन प्रीमिअर लीगसाठी निवड

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

गोव्याचा अष्टपैलू रणजीपटू सुयश प्रभुदेसाई याला आगामी आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी संधी मिळाली आहे.

पणजी : गोव्याचा अष्टपैलू रणजीपटू सुयश प्रभुदेसाई याला आगामी आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी संधी मिळाली आहे. गुरुवारी झालेल्या लिलावात त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने आपल्या संघात 20 लाख रुपये मूळ रकमेत सामावून घेतले.

सुयश 23 वर्षांचा आहे. गोव्याचे 16 रणजी सामन्यात प्रतिनिधित्व केलेला सुयश संघातील नियमित सदस्य आहे. एक शतक व सहा अर्धशतकांच्या मदतीने त्याने 922 धावा केल्या आहेत. 24 एकदिवसीय सामन्यांत त्याने चार अर्धशतकांसह 549 धावा केल्या असून 17 टी-20 सामन्यांत एका अर्धशतकासह 357 धावा केल्या आहेत. तो उपयुक्त मध्यगती गोलंदाजही आहे.

IPL 2021 Auction : 'हा' खेळाडू ठरला महागडा; तर अनकॅप खेळाडूंमध्ये...

स्वप्नील अस्नोडकर (राजस्थान रॉयल्स), शदाब जकाती (चेन्नई सुपरकिंग्ज) आणि सौरभ बांदेकर (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर) यांच्यानंतर आयपीएल स्पर्धेसाठी करार मिळणारा तो चौथा गोमंतकीय क्रिकेटपटू आहे.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज लोटलीकर यांनी आयपीएल लिलावात खरेदी केलेल्या सुयशचे अभिनंदन केले आहे. "सुयशच्या मेहनतीस फळ मिळाले आहे. त्याचे आम्ही अभिनंदन करत आहोत. गोवा क्रिकेट असोसिएशन राज्यातील क्रिकेटपटूंच्या प्रगतीसाठी कटीबद्ध आहे. कोविड-19 मुळे उदभवलेल्या प्रतिकुल परिस्थितीनंतर संघटनेने प्रशिक्षण संचालक व इतर सपोर्ट स्टाफच्या मदतीने गेल्या वर्षी  नोव्हेंबरपासून राज्यातील क्रिकेटपटूंसाठी सराव शिबिर सुरू केले. भविष्यात सुयशप्रमाणे आणखी क्रिकेटपटू आयपीएल मैदानात उतरतील ही आशा वाटते," असे सूरज लोटलीकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या