गोव्याच्या तनिशाची टॉप्ससाठी निवड

गोव्याच्या तनिशाची टॉप्ससाठी निवड
Tanisha Crasto

पणजी

ऑलिंपिक स्पर्धेत भारतासाठी पदकाचे लक्ष्य बाळगलेल्या टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्किम (टॉप्स) अंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) गोव्याची अव्वल ज्युनियर बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्टो हिची निवड केली आहे. १२ ऑलिंपिक क्रीडा प्रकारातील २५८ क्रीडापटूंना या योजनेत संधी मिळाली आहे.

तनिशा १९ वर्षांखालील वयोगटात सध्याची राष्ट्रीय ज्युनियर मिश्र दुहेरीतील विजेती आहे. राष्ट्रीय ज्युनियर मुलींच्या दुहेरीतील ती उपविजेती आहे. तनिशा हिने ज्युनियर गटात मुलींच्या दुहेरीत, तसेच मिश्र दुहेरीत राष्ट्रीय पातळीवरील विविध मानांकन स्पर्धांत यश मिळविले आहे. आशियाई व जागतिक ज्युनियर स्पर्धेत तनिशाने भारताच्या बॅडमिंटन संघात स्थान मिळविले होते. टॉप्सअंतर्गत तिची निवड झाल्याबद्दल गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

आगामी २०२४ व २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतासाठी पदकप्राप्ती करू शकणारे क्रीडापटू हेरणे हे टॉप्स योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. योजना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ‘मिशन ऑलिंपिक सेल’द्वारे राबविण्यात येते. त्याअंतर्गत निवड झालेल्या क्रीडापटूंना दरमाह २५ हजार रुपये भत्ता दिला जाईल. बॅडमिंटन खेळात देशभरातील २७ युवा गुणवान खेळाडूंची निवड झाली आहे.

राष्ट्रीय पातळीवर अवघ्या काही वर्षांतच छाप पाडलेली तनिशा हैदराबादस्थित साई-गोपीचंद बॅडमिंटन अकादमीतील प्रशिक्षणार्थी आहे. ती दुबईत राहते. हैदराबाद येथील अकादमीतील प्रशिक्षकांच्या ऑनलाईन मार्गदर्शनानुसा तिचा सध्या घरीच सराव सुरू आहे. ‘‘आज भल्या सकाळीच निवडीचे वृत्त ऐकून मी अतिशय आनंदित झाले. ऑलिंपिक खेळणे हेच माझे स्वप्न आणि लक्ष्य आहे, जे बॅडमिंटन खेळण्यास सुरवात केल्यानंतर पहिल्या दिवसापासून जोपासले आहे. देशासाठी पदक जिंकून देशवासीय, तसेच पालकांसाठी अभिमानास्पद कामगिरी करणे हेच ध्येय आहे,’’ असे तनिशाने दुबई येथून सांगितले.

आंतरराष्ट्रीय कोर्टवर छाप...

१७ वर्षीय तनिशा जागतिक ज्युनियर बॅडमिंटन मानांकनात सध्या मुलींच्या दुहेरीत १९व्या, तर मिश्र दुहेरीत ४५व्या क्रमांकावर आहे. भारतात ती द्वितीय मानांकित ज्युनियर बॅडमिंटनपटू आहे. २०१९ मध्ये नेपाळमधील काठमांडू येथे दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने तीन सुवर्णपदके जिंकली होती. गतवर्षी दुबईत झालेल्या ज्युनियर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती मुलींच्या दुहेरीत विजेती ठरली होती. गेल्या वर्षीच पुण्यात झालेल्या आंतराष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेत तिला मिश्र दुहेरीत रौप्यपदक मिळाले होते, बल्गेरियातील ज्युनियर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने मुलींच्या दुहेरीत विजेतेपदाचा मान मिळविला होता

संपादन- अवित बगळे

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com