गोव्याचा पुन्हा विजयश्री!

दिल्लीवर मात कर्णधार सुयश, कश्यपची अर्धशतके, मंथनचीही आक्रमक फलंदाजी
गोव्याचा पुन्हा विजयश्री!
Cricket Dainik Gomantak

पणजी : (Panaji) गोलंदाजांनी कामगिरी चोख बजावल्यानंतर कर्णधार सुयश प्रभुदेसाई व कश्यप बखले यांची अर्धशतके, तसेच मंथन खुटकरची आक्रमक फलंदाजी या बळावर गोव्याने बुधवारी 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट (Cricket) स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. एलिट ब गट लढतीत त्यांनी दिल्लीवर 5 विकेट राखून मात केली. सामना पुदुचेरी येथे झाला.

गोव्याने काल हरियानास 6 विकेट राखून हरविले होते. आजच्या विजयासह त्यांचे तीन लढतीनंतर 10 गुण झाले आहेत. गोव्याचा पुढील सामना गुरुवारी राजस्थानविरुद्ध होईल. या गटातील अन्य लढतीत बुधवारी हरियानाने रेल्वेवर तीन विकेट, तर पंजाबने राजस्थानवर ६ विकेट राखून मात केली.

Cricket
गोव्याने साकारला रोमहर्षक विजय !

हेरंब परब (3-24) याच्यासह गोव्याच्या गोलंदाजांनी शानदार मारा केल्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा दिल्लीचा निर्णय अंगलट आला. 5 बाद 58 वरून त्यांचा डाव 46 षटकांत 177 धावांत आटोपला. दिल्लीच्या वैभव कंदपाल व सुमीत माथूर यांनी अनुक्रमे 59 व 58 धावा करताना सहाव्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. मात्र नंतर 5 विकेट 37 धावांत गमावल्यामुळे दिल्लीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गोव्याने 36.2 षटकांत 5 बाद 178 धावा करून विजय मिळविला.

गोव्याची दमदार फलंदाजी

सुयशच्या नाबाद 58, सलग दुसरे अर्धशतक केलेल्या कश्यप बखलेच्या 50 धावा, तसेच मंथन खुटकरच्या 42 धावांमुळे गोव्याने सामना 13.4 षटके राखून आरामात जिंकला. लक्ष्याचा पाठलाग करताना गोव्यासाठी मंथन आणि कश्यप यांनी दुसऱ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. 42 धावांवर बाद झाल्यामुळे मंथनला सलग दुसरे अर्धशतक हुकले. त्याने 41 चेंडूंतील खेळीत चार चौकार व एक षटकार मारला. नंतर कश्यपला सुयशची भक्कम साथ लाभली. त्यामुळे गोव्याला विजयाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकता आले.

या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. अर्धशतकानंतर कश्यप लगेच बाद झाला. त्याने 76 चेंडूंत 50 धावा करताना तीन चौकार व एक षटकार मारला. रणजीपटू सुयशने लौकिकास साजेशी फलंदाजी करताना गोव्याला लागापोठ दुसरा विजय मिळवून दिला. तो 58 धावांवर नाबाद राहिला. त्याने 63 चेंडूंतील खेळीत सहा चौकार व दोन षटकार मारले.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली : 46 षटकांत सर्वबाद 177 वैभव कंदपाल 59, सुमीत चिकारा 15, सुमीत माथूर 58, हेरंब परब 8-1-24-3, समित आर्यन मिश्रा 7-0-27-0, वेदांत नाईक 10-0-35-1, निहाल सुर्लकर 7-0-36-1, सुयश प्रभुदेसाई 6-0-29-1, धीरज यादव 8-0-२६-१ पराभूत वि. गोवा : 36.2 षटकांत 5 बाद 178 सोहम पानवलकर 4, मंथन खुटकर 42, कश्यप बखले 50, सुयश प्रभुदेसाई नाबाद 58, आलम खान 9, आदित्य सूर्यवंशी 2, वेदांत नाईक नाबाद 1, मयांक यादव 1-29, आयुष बदोनी 1-22, सिद्धांत बन्सल 1-41, सुमीत माथूर 2-13.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com