गोव्याच्या महिलांची चमकदार सलामी; पूर्वजा, शिखा, संजुलाची छाप

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

गोव्याने महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात विजयी सलामी देताना चंडीगडवर 78 धावांनी सहज विजय प्राप्त केला.

पणजी: गोव्याने महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात विजयी सलामी देताना चंडीगडवर 78 धावांनी सहज विजय प्राप्त केला. पूर्वजा वेर्लेकर हिच्या शानदार फलंदाजीनंतर, वेगवान शिखा पांडे व संजुला नाईक यांच्यासह गोलंदाजीतील भेदकतेमुळे गोव्याला विजयाने मोहिमेस सुरवात करता आली. राजस्थानमधील जयपूर येथील के. एल. सैनी स्टेडियमवर शुक्रवारी सामना झाला. चंडीगडने नाणेफेक जिंकून गोव्यास प्रथम फलंदाजी दिली. पूर्वजाच्या 43 धावा, तसेच दीक्षा गावडे व सोनाली गवंडर यांनी नवव्या विकेटसाठी केलेल्या 66 धावांच्या भागीदारीमुळे गोव्याला 9  बाद 173 धावांची मजल मारता आली.  भारतीय संघातील स्थान गमावलेल्या शिखा पांडे हिने जबरदस्त मारा करताना 10 धावांत 3 गडी टिपले. संजुलानेही आठ धावांत तिघींना माघारी धाडले. यामुळे चंडीगडचा डाव 42.2 षटकांत 95 धावांत आटोपला.

INDVsENG T20 Series : भारत विरूद्ध इंग्लंड पहिला T20 सामना आज

गोव्याच्या डावाची सुरवात खळबळजनक ठरली. सहाव्या षटकात 4 बाद 17 अशी दाणादाण उडाल्यानंतर गोव्याला पूर्वजा व तेजस्विनी दुर्गड (21) यांनी पाचव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी करून सावरले. मात्र तेजस्विनी व पूर्वजा दोन धावांच्या फरकाने बाद झाल्यामुळे गोव्याचा संघ पुन्हा संकटात सापडला आणि नंतर 33व्या षटकात त्यांची 8 बाद 101 अशी दयनीय स्थिती झाली. दीक्षा (नाबाद 34) व सोनाली (30) यांनी जिगर दाखविल्यामुळे गोव्याला पावणेदोनशे धावांच्या आसपास जाता आले.  उत्तरादाखल 10 धावांत पाच विकेट गमावलेल्या चंडीगडला गोव्याचे आव्हान पेलवलेच नाही. 6 बाद 40 वरून शतकी धावसंख्येसाठी पाच धावा हव्या असताना त्यांचा डाव आटोपला. शिखा व संजुला यांच्या तीन विकेटव्यतिरिक्त रूपाली चव्हाण हिने दोघींना बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गोवा ः 50 षटकांत 9 बाद 173 (विनवी गुरव 0, पूर्वजा वेर्लेकर 43- 75 चेंडू, 5 चौकार, सुनंदा येत्रेकर 4, शिखा पांडे 0, संजुला नाईक 0, तेजस्विनी दुर्गड 21, सुगंधा घाडी 4, निकिता मळीक 16, दीक्षा गावडे नाबाद 34- 76 चेंडू, 5 चौकार, सोनाली गवंडर 30- 37 चेंडू, 6 चौकार, रूपाली चव्हाण नाबाद 1, कश्वी गौतम 3-36, अमनज्योत कौर 3-42, कुमारी शिबी 1-14, रजनी देवी 2-16) वि. वि. चंडीगड ः 42.2 षटकांत सर्व बाद 95 (मोनिका पांडे 21, मनीषा बधान 38, कश्वी गौतम 12, शिखा पांडे 7.2-2-10-3, निकिता मळीक 5-1-23-0, सुनंदा येत्रेकर 8-3-10-1, रूपाली चव्हाण 8-2-17-2, तेजस्विनी दुर्गड 6-1-11-0. दीक्षा गावडे 2-0-8-0, सोनाली गवंडर 1-0-6-0, संजुला नाईक 5-2-8-3).
 

संबंधित बातम्या