फुटबॉलपटू प्रतेशसाठी नवी संधी

किशोर पेटकर
गुरुवार, 30 जुलै 2020

२०१७-१८ मोसमापासून त्याला एफसी गोवाकडून प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याची क्वचितच संधी लाभली. दोन मोसमात (२०१७-१८ व २०१८-१९) फक्त तो तीनच आयएसएल सामने खेळू शकला.

पणजी : गतमोसमात स्पर्धात्मक फुटबॉल मैदानापासून दूर राहिलेल्या गोव्याच्या प्रतेश शिरोडकर याला आगामी मोसमात नवी संधी प्राप्त झालीय. आय-लीग स्पर्धेतील संघ श्रीनगरच्या रियल काश्मीर संघात तो आता दिसेल.

गतमोसमात (२०१९-२०) प्रतेश एकही सामना खेळू शकला नाही. आयएसएल स्पर्धेतील संघ हैदराबाद एफसीसाठी चाचणी देत असताना त्याला इतर संघाकडून खेळण्याची संधी हुकली. त्यामुळे त्याला धेंपो स्पोर्टस क्लब संघातून सराव करावा लागला. त्यापूर्वी तो आयएसएल स्पर्धेत एफसी गोवा संघाकडून खेळला होता. ३१ वर्षीय प्रतेश मध्यफळीत अथवा बचावफळीत खेळतो. उंचीने कमी असलातरी कळंगुटच्या हा खेळाडू परिणामकारक ठरतो.

प्रतेश वयाच्या १३व्या वर्षीपासून स्पर्धात्मक फुटबॉल खेळत आहे. गोवा युनायटेड स्पोर्टस अकादमीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर तो २००७ मध्ये सेझा फुटबॉल अकादमीत रुजू झाला. तेथे तो पाच वर्षे होता. त्याअगोदरशालेय पातळीवर तो कळंगुटच्या लिटल फ्लॉवर ऑफ जेझूस हायस्कूलतर्फेतर राष्ट्रीय पातळीवर गोव्याकडून खेळला. २०१२ साली प्रतेशशी स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने करार केला. २०१५ साली तो आयएसएल संघ मुंबई सिटी एफसीत दाखल झाला. वर्षभरानंतर त्याने एफसी गोवाशी करार केला. २०१७ मध्ये लोनवर आय-लीग संघ मुंबई एफसीकडून खेळला. २०१७-१८ मोसमापासून त्याला एफसी गोवाकडून प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याची क्वचितच संधी लाभली. दोन मोसमात (२०१७-१८ व २०१८-१९) फक्त तो तीनच आयएसएल सामने खेळू शकला.

संपादन - तेजश्री कुंभार 

संबंधित बातम्या