गोव्याच्या लिऑनला ग्रँडमास्टर नॉर्म

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

गोव्याचा युवा इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू लिऑन मेंडोसा याने हंगेरीतील स्पर्धा जिंकताना ग्रँडमास्टर किताबाचा पहिला नॉर्मही प्राप्त केला.

पणजी : गोव्याचा युवा इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू लिऑन मेंडोसा याने हंगेरीतील स्पर्धा जिंकताना ग्रँडमास्टर किताबाचा पहिला नॉर्मही प्राप्त केला. कोविड-१९ सुरक्षा शिष्टाचाराचे पालन करून हंगेरीत झालेल्या रिगोचेस आंतरराष्ट्रीय महोत्सवात लिऑनने विजेतेपदास गवसणी घातली. या चौदा वर्षीय बुद्धिबळपटूने सहा डाव जिंकले, दोन डाव बरोबरीत राखले, तर केवळ एक डाव गमावला. त्याने एकूण सात गुणांची कमाई केली. १० खेळाडूंच्या या स्पर्धेत तिघे जण ग्रँडमास्टर होते.

गोव्याच्या गुणवान बुद्धिबळपटूच्या खाती सध्या २४९९ एलो गुण आहेत. स्पर्धेतील पहिल्या डावात त्याने इंटरनॅशनल मास्टर विल्यम पास्चल याला हरविले, पण नंतर त्याला आलेक्स क्रस्तुलोविच याच्याकडून धक्कादायक हार स्वीकारावी लागली. तिसरा डाव बरोबरीत राखल्यानंतर लिऑनने ओळीने पाच डाव जिंकले. या वाटचालीत त्याने न्गुयेन ह्यून्ह मिन्ह हुय व डेव्हिड बेर्सेझ या दोघा ग्रँडमास्टर खेळाडूंना हरविले. नवव्या फेरीत त्याने हंगेरीयन ग्रँडमास्टर एडम कोझाक याच्या बरोबरी साधत, जवळच्या प्रतिस्पर्ध्यावर अर्धा गुणाची आघाडी राखून विजेतेपद मिळविले. हा डाव सुमारे साडेपाच तास चालला. हंगेरीतील आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्याबद्दल, तसेच ग्रँडमास्टर किताबाचा पहिला नॉर्म प्राप्त झाल्याबद्दल लिऑनने आनंद व्यक्त केला आहे. अगोदरच्या स्पर्धेत त्याला हा नॉर्म अगदी थोडक्यात हुकला होता. 

संबंधित बातम्या