भारतीय फुटबॉलपटूंना मोठी संधी- फेरांडो

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

एफसी गोवा संघातील भारतीय फुटबॉलपटूंना फार मोठी संधी प्राप्त होत आहे.

पणजी : आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत नियमानुसार फक्त चार परदेशी खेळाडू करारबद्ध असल्याने मोठ्या व्यासपीठावर खेळताना एफसी गोवा संघातील भारतीय फुटबॉलपटूंना फार मोठी संधी प्राप्त होत आहे, असे मत संघाचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघात सहा परदेशी खेळाडू होते. चँपियन्स लीग स्पर्धेच्या नियमानुसार दोघा परदेशींना आता वजा करण्यात आले आहे. त्यामुळे आयएसएलमधील गोल्डन बूट विजेता इगोर आंगुलो आणि सर्वाधिक आठ असिस्ट नोंदविणारा आल्बर्टो नोगेरा या स्पॅनिश खेळाडूंना एफसी गोवा संघात स्थान मिळू शकले नाही. ऑस्ट्रेलियन जेम्स डोनाकी, इव्हान गोन्झालेझ, एदू बेदिया, होर्गे ओर्तिझ हे स्पॅनिश संघातील परदेशी खेळाडू आहेत. (Great opportunity for Indian footballers  Ferrando)

फेरांडो म्हणाले, ``चँपियन्स लीग स्पर्धेत खेळताना भारतीय फुटबॉलपटूंना मानसिकदृष्ट्या तयार राहावे लागेल आणि ही मोठी संधी आहे हे ध्यानात ठेवावे लागेल. या अनुभवाद्वारे त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अधिक वेगाने परिपक्त होता येईल.`` एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी निवडलेल्या २८ सदस्यीय एफसी गोवा संघातील भारतीय फुटबॉलपटूंत अकरा जण गोमंतकीय आहेत. आयएसएल स्पर्धेत युवा भारतीय फुटबॉलपटूंना पुरेशी संधी मिळत नसल्याने त्यांनी फेरांडो यांनी खंत व्यक्त केली.

AFC champions league 2021:गोव्यात पहिल्यांदाच फुटबॉलचे सामने रात्री उशिरा

एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेतील ई गट सामने 14 एप्रिलपासून गोव्यात खेळले जातील. कतारच्या अल रय्यान संघाविरुद्ध एफसी गोवाचा पहिला सामना होईल. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीचा अल वाहदा आणि इराणचा गतउपविजेत्या पर्सेपोलिस या संघाविरुद्ध लढती होतील आणि नंतर याच संघांविरुद्ध परतीचे सामने होतील. गोव्यातील सध्याचे वातावरण उष्ण आणि दमट आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळण्याचा एफसी गोवास लाभ मिळू शकतो, पण फेरांडो यांना तसे वाटत नाही. आयएसएल स्पर्धेनंतर फेरांडो कोविड-१९ बाधित ठरले होते, त्यातून ते आता सावरले असून महत्त्वाच्या स्पर्धेत संघाला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

खूप महत्त्वाची स्पर्धा

एएफसी चँपियन्स लीग स्पर्धा खूप महत्त्वाची आहे, असे स्पॅनिश प्रशिक्षक फेरांडो यांनी नमूद केले. विश्वकरंडक, युरोपातील (यूईएफए) चँपियन्स लीग, तसेच कोपा लिबेर्तादोरीस या स्पर्धांच्या तोडीची एएफसी चँपियन्स लीग स्पर्धा आहे, असे फेरांडो यांनी सांगितले. ``एफसी गोवासाठी ही प्रमुख स्पर्धा असून त्यात सहभागी होण्याच्या प्रतिष्ठेची जाणीव मी प्रत्येकास करून देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येकासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा निर्णायक असेल,`` असे फेरांडो यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या