गोलरक्षक गुरप्रीत सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू; महिला खेळाडू संजू, रतनबाला, अनिरुद्ध यांनाही पुरस्कार

क्रीडा प्रतिनिधी
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

भारतीय सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्कारासाठी गुरप्रीत याची प्रथमच निवड झाली आहे. हा पुरस्कार मिळणारा तो दुसराच गोलरक्षक आहे. यापूर्वी २००९ साली अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉल देशातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ठरला होता.

पणजी: राष्ट्रीय संघाचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू २०१९-२० मोसमातील सर्वोत्तम भारतीय फुटबॉलपटू ठरला आहे. महिला संघाची मध्यरक्षक संजू महिला गटात उत्कृष्ट ठरली, तर युवा मध्यरक्षक अनिरुद्ध थापा सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख फुटबॉलपटू ठरला. महिला गटात हा पुरस्कार रतनबाला देवी हिला प्राप्त झाला.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने २०१९-२० मोसमातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) आणि आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील संघांच्या प्रशिक्षकांच्या मतदानानुसार पुरस्कार विजेत्यांची निवड झाली. 

भारतीय सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्कारासाठी गुरप्रीत याची प्रथमच निवड झाली आहे. हा पुरस्कार मिळणारा तो दुसराच गोलरक्षक आहे. यापूर्वी २००९ साली अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉल देशातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ठरला होता. २८ वर्षीय गुरप्रीत गतवर्षी अर्जुन पुरस्काराचाही मानकरी ठरला होता. भारतातील सर्वोत्तम फुटबॉलपटू बनण्यामागे आपणास सुनील छेत्री याच्याकडून प्रेरणा लाभल्याचे गुरप्रीतने नमूद केले. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत बंगळूर एफसीकडून खेळताना तो गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार विजेता ठरला होता. 

महिला गटात भारताच्या राष्ट्रीय संघाची मध्यरक्षक संजू सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. रतनबाला देवी उदयोन्मुख महिला फुटबॉलपटू ठरली आहे. या दोघींची निवड भारतीय महिला संघाची मुख्य प्रशिक्षक मेमॉल रॉकी यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे तांत्रिक संचालक इसाक दोरू यांच्याशी सल्लामसलत करून केली. या पुरस्कारामुळे आपल्या मेहनतीचे चीज झाल्याची प्रतिक्रिया संजू हिने दिली.

अन्य वार्षिक पुरस्कारांसाठी एल. अजित कुमार (मणिपूर, उत्कृष्ट रेफरी),  पी. वैरामुथू (तमिळनाडू, उत्कृष्ट सहाय्यक रेफरी) यांची निवड झाली.

गोमन्तक वृत्तसेवा

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या