डार्क हॉर्स जमशेदपूरचे धोकादायक आव्हान

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

जेरार्ड नूस यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेड संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सध्या अपराजित आहे.

पणजी: जेरार्ड नूस यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट युनायटेड संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सध्या अपराजित आहे. शुक्रवारी धोकादायक जमशेदपूर एफसीचे आव्हान पार केल्यास स्पर्धेतील ‘टॉप थ्री’ संघांतील स्थान बळकट करण्याची संधी गुवाहाटीतील संघाला मिळेल. सामना वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल.

जमशेदपूरला कमी लेखणे धोक्याचे असेल. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील हा संघ डार्क हॉर्स असून शेवटपर्यंत झुंज देतो. बलाढ्य मुंबई सिटीविरुद्ध सामन्यात तासभर दहा खेळाडूंसह खेळूनही सामना बरोबरीत राखला होता. मात्र नॉर्थईस्टविरुद्ध त्यांना हुकमी खेळाडू ऐतॉर मॉनरॉय याची अनुपस्थिती जाणवू शकते. मुंबई सिटीविरुद्ध या स्पॅनिश खेळाडूस रेड कार्ड मिळाले होते.

नॉर्थईस्ट युनायटेडने शुक्रवारी स्पर्धेतील तिसरा विजय नोंदविल्यास त्यांचे मुंबई सिटी आणि एटीके मोहन बागान यांच्याइतकेच 13 गुण होतील. सध्या दोन विजय आणि चार बरोबरी या कामगिरीसह त्यांचे 10 गुण आहेत. जमशेदपूर एफसीने एक विजय, चार बरोबरी व एका पराभवासह सात गुणांची कमाई केली आहे. नॉर्थईस्ट युनायटेडसमोर जमशेदपूरचा यशस्वी स्ट्रायकर नेरियूस व्हॅल्सकिस याचा धोका असेल. या लिथुआनियन आघाडीपटूने सध्या स्पर्धेत सहा गोल नोंदविले आहेत. मुंबई सिटीविरुद्ध स्टीफन इझे व पीटर हार्टली यांनी भक्कम बचाव प्रदर्शित केला होता, त्यामुळे नॉर्थईस्ट युनायटेडच्या आक्रमकांना मोकळीक मिळविण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.

‘‘आम्ही खूप परिश्रम घेत असून पराभूत होणार नाही याची खात्री करत आहोत. प्रत्येक सामन्यात तीन गुण मिळविण्याचा आमचा प्रयत्न असतो. महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही प्रगतीपथावर राहतो,’’ असे सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त करताना नूस यांनी सांगितले. नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धचा सामना खडतर असेल, असे कॉयल यांना वाटते. आपल्या संघाने शुक्रवारी सर्वोत्तम खेळ केल्यास विजय शक्य आहे, असा विश्वासही त्यांना व्यक्त केला.

आणखी वाचा:

विराटला ऑस्ट्रेलियाबरोबर खुन्नस नको, स्पर्धा हवी  ! -

दृष्टिक्षेपात...

  • आयएसएल स्पर्धेच्या सातव्या मोसमात नॉर्थईस्ट युनायटेडचे 8, तर जमशेदपूरचे 7 गोल
  •  दोन्ही संघांच्या यंदा प्रत्येकी 4 बरोबरी
  • गतमोसमातील 2 लढतीत बरोबरी, जमशेदपूर येथे 1-1, तर गुवाहाटी येथे 3-3 गोलफरक
  • जमशेदपूर एफसीच्या नेरियूस व्हॅल्सकिस याचे 6 गोल

संबंधित बातम्या