बलाढ्य एटीके मोहन बागानचे फातोर्ड्यात खडतर आव्हान

दैनिक गोमन्तक
शनिवार, 2 जानेवारी 2021

जेरार्ड नूस यांच्या मार्गदर्शनाखालील गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेड संघाने यावेळच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय खेळ केला

पणजी : जेरार्ड नूस यांच्या मार्गदर्शनाखालील गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेड संघाने यावेळच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय खेळ केला, पण ते बरोबरीच्या भोवऱ्यात अडकलेले दिसत आहेत. आठपैकी पाच लढतीत त्यांना फक्त एका गुणावर समाधान मानावे लागले.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रविवारी (ता. 3) बलाढ्य एटीके मोहन बागान संघाने खडतर आव्हान नॉर्थईस्ट युनायटेडसमोर असेल. अंतोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानने  स्पर्धेतील आठपैकी पाच लढतीत विजय मिळविला असून फक्त तीन गोल स्वीकारलेल्या या संघाचे 17 गुण आहेत. नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध पूर्ण तीन गुणांची कमाई करत गुणतक्त्यात अग्रस्थानाच्या शर्यतीत मुंबई सिटी एफसीला मागे टाकण्याचा कोलकात्यातील संघाचा इरादा असेल. एटीके मोहन बागानने स्पर्धेतील सहा सामन्यांत एकही गोल स्वीकारलेला नाही. गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याच्या भक्कम बचावामुळे त्यांनी अगोदरच्या लढतीत चेन्नईयीन एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखले होते.

नॉर्थईस्ट युनायटेडचे आठ लढतीनंतर 11 गुण असून ते सध्या सहाव्या क्रमांकावर आहेत. स्पर्धेत त्यांनी केवळ दोन सामने जिंकले आहेत. मागील चार लढतीत तीन बरोबरी व एका पराभवामुळे त्यांना फक्त तीन गुणांवर समाधान मानावे लागले आहे. बारा दिवसांपूर्वी त्यांना तळाच्या ओडिशा एफसीनेही गोलबरोबरीत रोखले होते. एटीके मोहन बागानचा बचाव स्पर्धेत सर्वोत्तम गणला जातो, साहजिकच गुवाहाटीच्या संघाला खूप परिश्रम घ्यावे लागण्याचे संकेत आहेत.

तळाच्या संघात लढत

वास्को येथील टिळक मैदानावर रविवारी (ता. 3) ईस्ट बंगाल आणि ओडिशा एफसी या तळातील संघात लढत होईल. सध्या हे संघ अनुक्रमे दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर आहेत. प्रत्येकी सात सामने खेळल्यानंतरही दोन्ही संघ विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. ईस्ट बंगालचे तीन बरोबरीमुळे तीन गुण आहेत, तर ओडिशाच्या खाती दोन बरोबरीमुळे दोन गुण जमा झाले आहेत. दोन्ही संघांचा बचाव कमजोर ठरला आहे. ईस्ट बंगालने 13, तर ओडिशाने 11 गोल स्वीकारले आहेत. स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी दोन्ही संघांचे रविवारी प्रयत्न असतील.

 

दृष्टिक्षेपात...

  • - एटीके मोहन बागानच्या स्पर्धेत 6 क्लीन शीट, त्यापैकी 3 सलग
  • - एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्जने 24 फटके अडवलेत
  • - एटीके मोहन बागानचा रॉय कृष्णाचे 5 गोल
  • - नॉर्थईस्ट युनायटेडच्या क्वेसी अप्पियाचे 3 गोल
  • - नॉर्थईस्ट युनायटेडचे 10, तर एटीके मोहन बागानचे 8 गोल

संबंधित बातम्या