बळींचे अर्धशतक, तरीही जेठाजीची संधी हुकली

किशोर पेटकर
रविवार, 17 मे 2020

अनुभवागणिक आणि अथक मेहनतीवर भर राहिल्यास गोव्याच्या या युवा फिरकी गोलंदाजास आणखी प्रगती साधण्याची संधी राहील, असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.

पणजी,

गोव्याचा युवा फिरकीपटू हर्ष जेठाजी याच्यासाठी २०१९-२० मोसम बळी मिळविण्याच्या बाबतीत फलदायी ठरला. १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक चार दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत त्याने बळींचे अर्धशतक पार करताना ५४ गडी बाद केलेमात्र स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्सचा मान त्याला अगदी थोडक्यात हुकला.

जेठाजीप्रमाणेच डावखुरा फिरकीपटू असलेल्या विदर्भाच्या हर्ष दुबे याने कुचबिहार करंडक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करताना ११ सामन्यांत ५८ विकेट्स मिळविले. तो गोव्याच्या गोलंदाजाच्या तुलनेत दोन सामने जास्त खेळला.

विदर्भाला २०१९-२० मोसमातील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले. बडोद्याविरुद्धच्या अंतिम लढतीत हर्ष दुबेने दोन्ही डावात मिळून ९ गडी बाद केले, त्यामुळे त्याला गोव्याच्या गोलंदाजास  ४ विकेट्सनी मागे टाकणे शक्य झाले. स्पर्धेत गोव्याचा संघ प्लेटतर विदर्भाचा संघ एलिट गटात खेळला.

गोव्याच्या हर्ष जेठाजीने कुचबिहार करंडक स्पर्धेत ९ सामन्यांत ९.७७च्या सरासरीने बळींचे अर्धशतक गाठले. चार वेळा त्याने डावात पाचतर एक वेळ सामन्यात १० गडी बाद करण्याचा पराक्रम साधला. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत मडगाव क्रिकेट क्लबच्या डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर पुद्दूचेरीविरुद्ध हर्षने पहिल्या डावात ४८ धावांत ६तर दुसऱ्या डावात ४९ धावांत ४ गडी बाद एकूण ९७ धावांत १० गडी टिपले. कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी त्याने याच मैदानावर सिक्कीमविरुद्ध नोंदविली. अवघ्या ६ धावांत ६ गडी बाद करताना त्याने पहिल्या डावात ११.३ पैकी ८ षटके निर्धाव टाकली.

 

आणखी मेहनत आवश्यक

प्लेट गटात हर्षने पन्नासहून जास्त गडी बाद केलेपण प्रतिस्पर्धी कमजोर असल्याचा फायदा झाल्याचेही मानले जाते. कारणबिहार (३-१०६) व चंडीगड (२-१०४) या तुलनेत मातब्बर असलेल्या संघांविरुद्ध जेठाजीच्या फिरकीला पूर्ण वर्चस्व राखणे जमले नाही. अनुभवागणिक आणि अथक मेहनतीवर भर राहिल्यास गोव्याच्या या युवा फिरकी गोलंदाजास आणखी प्रगती साधण्याची संधी राहील, असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.

 

संबंधित बातम्या