पॉवरब्रेकनंतरचे यश नक्कीच जास्त सुखावणारे: विदित गुजराती

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

मंगोलियाविरुद्धच्या या बरोबरीने नक्कीच दडपण वाढले होते, पण या स्पर्धेत आपली कामगिरी सरस होत आहे. आपण सहज जिंकत आहोत, त्यामुळे हाच खेळ कायम राहिल्यास अखेरच्या दिवशी कामगिरी अवघड नाही याची जाणीव होती, असे विदितने सांगितले.

मुंबई: मंगोलियाविरुद्धच्या लढतीच्या वेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा फटका आम्हाला बसला होता, पण त्या धक्‍क्‍यातून सावरत भारताने तिसऱ्या दिवशी तीनही प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मिळवलेले विजय सुखावणारे आहेत, असे प्रतिपादन भारताचा कर्णधार विदित गुजरातीने व्यक्त केले.

ऑनलाईन ऑलिंपियाडमध्ये भारताने ताकदवान चीनला हरवून अ गटात अव्वल क्रमांक मिळवला. शनिवारी मंगोलियाविरुद्ध खेळताना विदित आणि हंपीच्या घरी विद्युत पुरवठा खंडित झाला, त्यांचे इंटरनेट बंद झाले, त्यामुळे ते निर्धारित वेळेत चाली पूर्ण करता आल्या नाहीत आणि पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे भारतास बरोबरी पत्करावी लागली.

मंगोलियाविरुद्धच्या या बरोबरीने नक्कीच दडपण वाढले होते, पण या स्पर्धेत आपली कामगिरी सरस होत आहे. आपण सहज जिंकत आहोत, त्यामुळे हाच खेळ कायम राहिल्यास अखेरच्या दिवशी कामगिरी अवघड नाही याची जाणीव होती, असे विदितने सांगितले. आमचे प्रत्येक यश हे सांघिक आहे. चीनविरुद्धही सर्वांनीच चांगली कामगिरी केली. वरिष्ठ खेळाडूंनी ताकदवान प्रतिस्पर्ध्यांना रोखले आणि कुमार खेळाडूंनी अपेक्षांची पूर्ती केली.

 

 

अ गटात पहिल्या तीन बाद फेरीत प्रवेश करणार याची खात्री होती. आता गटात अव्वल आल्यामुळे थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे, त्यामुळे पूर्वतयारीस एक दिवस जास्त मिळणार आहे त्याचा पुरेपूर फायदा घेणार आहोत, असे कर्णधार विदितने आवर्जून सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या