दुखापतींचे सत्य स्वीकारलेयः हार्दिक पंड्या

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

दुखापती आपल्याबरोबर राहाणार आहेत, याची जाणीव मला झाली आहे. दुखापतग्रस्त व्हायला कोणालाही आवडत नसते, पण मी सत्य स्वीकारलेय.

दुबई: दुखापती या आपल्या कारकिर्दीचा भाग झाल्या आहेत, त्यामुळे त्या अपेक्षित धरूनच खेळत राहायला मी शिकलो आहे, असे मत मुंबई इंडियन्सचा आक्रमक अष्टपैलू हार्दिक पंड्याने व्यक्त केले. दुखापतीतून सावरल्यानंतर अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणाही मिळत असल्याचे तो म्हणाला.

दुखापती आपल्याबरोबर राहाणार आहेत, याची जाणीव मला झाली आहे. दुखापतग्रस्त व्हायला कोणालाही आवडत नसते, पण मी सत्य स्वीकारलेय. दुखापतीतून मार्ग काढत प्रवास करायचाय आणि स्वतःला प्रोत्साहितही करत राहायचेय, खरं तर दुखापतीतून बरे होत असताना आपण किती मोठी मजल मारू शकतो याचाही अंदाज मला आला आहे, असे पंड्याने सांगितले.

मी आणि माझा भाऊ क्रृणाल आम्हासाठी सुदैवाची गोष्ट म्हणजे घरीच चांगली व्यायामशाळा आहे. त्यामुळे आम्ही घरी असताना जिममध्ये मेहनत घेत असतो. अगोदरपेक्षा प्रत्येक वेळ आपण अधिक तंदुरुस्त कसे होऊ यावर भर देत असतो. तंदुरुस्तीमध्ये आपण एक पाऊल पुढे टाकत राहिलो तर अनेक चांगले बदल झालेले दिसून येतात, असा विश्‍वास आयपीएलची तयारी जोमात करत असलेल्या हार्दिकने सांगितले. 

महेंद्रसिंग धोनीप्रमाणे हार्दिकही विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यावरही तो जाऊ शकला नव्हता. डीवाय पाटील ट्‌वेन्टी-२० स्पर्धा माझ्यासाठी सुदैवी ठरली. या स्पर्धेतून मला आत्मविश्‍वास मिळाला. प्रदीर्घ कालावधीनंतर खेळत असतानाही लय पुन्हा मिळाली होती. मानसिकदृष्ट्याही मी सक्षम होत गेलो होतो. मैदानावर घालवलेला तो वेळ माझ्या प्रगतीसाठी मोलाचा ठरला, असे हार्दिकने सांगितले. कोरोना महामारी सुरू होण्याअगोदर नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडियवर झालेल्या या स्पर्धेत हार्दिक रिलायन्स संघातून खेळला होता.

आयपीएल ही माझ्यासाठी नेहमीच खास स्पर्धा राहिलेली आहे. यंदाच्या स्पर्धेतून मला पुन्हा जोरदार पुनरागमन करायचे आहे. स्पर्धा सुरू होण्याची मी आतुरतेने वाट पाहात आहे, असे हार्दिक म्हणतो. येत्या १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये सलामीला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा सामना होणार आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या