पणजी- गोव्याचा अनुभवी मध्यमगती गोलंदाज हर्षद गडेकर याला तब्बल चार वर्षांनंतर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पुनरागमनाची संधी असेल. या ३३ वर्षीय गोलंदाजाची ३१ सदस्यीय संभाव्य क्रिकेट संघात निवड झाली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी २०२०-२१ देशांतर्गत क्रिकेट मोसम जानेवारीच्या प्रारंभी सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. या अनुषंगाने रणजी संघ तयारीसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) संभाव्य खेळाडूंची यादी मंगळवारी जाहीर केली. त्यात वयोगट स्पर्धेत चमकलेले ऋत्विक नाईक, मोहित रेडकर, ईशान गडेकर, निहाल सुर्लकर, समित आर्यन मिश्रा या नवोदितांचा समावेश आहे.
दुखापत व शस्त्रक्रियेमुळे गतमोसमात रणजी स्पर्धा खेळू न शकलेला अमोघ देसाई यालाही संभाव्य चमूत स्थान मिळाले आहे. पाहुणे (व्यावसायिक) क्रिकेटपटू बंगालचा वेगवान गोलंदाज अशोक डिंडा, मुंबईचा यष्टिरक्षक एकनाथ केरकर आणि कर्नाटकचा अष्टपैलू गतमोसमातील कर्णधार अमित वर्मा यांचाही संभाव्य संघात समावेश आहे. गतमोसमातील पाहुणा क्रिकेटपटू दिल्लीचा आदित्य कौशिक गोव्यासाठी यंदा स्थानिक असेल. त्याने आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली आहे.
गोव्याकडून २००७ ते २०१६ या कालावधीत २३ रणजी क्रिकेट सामने खेळलेला हर्षद दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. ६ ते ९ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत नागपूर येथे तो हैदराबाद येथे शेवटचा सामना खेळला होता. हर्षदने रणजी स्पर्धेत ६७ विकेट्स मिळविल्या असून दोन अर्धशतकांच्या मदतीने ३२६ धावा केल्या आहेत. आता तंदुरुस्तीच्या बळावर तो पुनरागमन करण्यास इच्छुक आहे हे त्याच्या संभाव्य संघातील निवडीने स्पष्ट होते.
प्राप्त माहितीनुसार, एक नोव्हेंबरपासून गोव्याच्या संभाव्य रणजी संघाचे शिबिर सुरू करण्याचे जीसीएचे नियोजन आहे. कोविड-१९ मार्गदर्शक शिष्टाचाराचे काटेकोर पालन करून शिबिर घेण्यासाठी जीसीएचे प्रयत्न आहेत. सारे नियोजनानुसार झाल्यास पाहुण्या खेळाडूंसह गोव्यातच संभाव्य संघाचे शिबिर घेतले जाईल.
गोव्याचा संभाव्य रणजी चमू
अमोघ देसाई, स्नेहल कवठणकर, सुमीरन आमोणकर, सुयश प्रभुदेसाई, वैभव गोवेकर, आदित्य कौशिक, दीपराज गावकर, मोहित रेडकर, समर दुभाषी, राजशेखर हरिकांत, कीनन वाझ, ईशान गडेकर, दर्शन मिसाळ, फेलिक्स आलेमाव, हेरंब परब, लक्षय गर्ग, विजेश प्रभुदेसाई, अभिलाष रायकर, ऋत्विक नाईक, निहाल सुर्लकर, समीत आर्यन मिश्रा, मलिक सिरूर, शुभम देसाई, वेदांत नाईक, विश्वंबर काहलोन, अमूल्य पांड्रेकर, श्रीनिवास फडते, हर्षद गडेकर, अशोक डिंडा, एकनाथ केरकर, अमित वर्मा.