तो शांत... बाकीचे खल्लास

सुनंदन लेले
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

१५ ऑगस्टला संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्जच्या ड्रेसिंग रूममधे काय घडले त्याची खरी कहाणी खास ‘गोमन्तक’च्या वाचकांसाठी

नेटमध्ये सराव सुरू असताना तो नेहमी अगदी शेवटचा फलंदाज शेवटचा चेंडू खेळेपर्यंत मैदानात जातीने हजर असतो. १५ ऑगस्टला त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या सरावाचा शेवटचा टप्पा चालू असताना ७.१५ वाजता आपली बॅग आवरली, भरली आणि तो आत ड्रेसिंग रूममधे गेला. इतक्‍या वर्षात त्याला मोबाईल वापरताना कोणीच बघितले नव्हते. शनिवारी मात्र त्याने मोबाईल बाहेर काढला. तो कोणाशी काही बोलला नाही. त्याने फोनवर काही तरी टाइप केले आणि नंतर बटण दाबून झाल्यावर तो गालातल्या गालात हसला आणि एकदम शांत बसून होता...

एव्हाना ७.३० नंतर बाकीचे सहकारी हळूहळू सराव संपवून आत आले आणि मग सगळे आपापला फोन बघू लागले, तेव्हा व्हायचा तो आघात झाला. महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, हे इन्स्टाग्रामच्या त्याच्या सरळ साध्या पोस्टवरून खेळाडूंना समजले. कोणाचाच विश्‍वास बसत नव्हता. खास करून सुरेश रैना जाम भावुक झाला होता. धोनी ड्रेसिंग रूम मागच्या भागात असलेल्या हॉलमध्ये गेला आणि खेळाडूंमध्ये हळू आवाजात कुजबुज चालू झाली. सगळेच दबक्‍या आवाजात आश्‍चर्य व्यक्त करत होते.

थोडा वेळ गेला नसेल, तर सुरेश रैना आत गेला आणि त्यानेही सोशल मीडियावर पोस्ट करून आपण धोनीच्या निवृत्तीच्या प्रवासात बरोबर असल्याचे सांगत आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मग सगळे डायनिंग टेबलवर बसले. धोनी नेहमीप्रमाणे हसत खेळत गप्पा मारत जेवायला लागला. बाकीच्या खेळाडूंनी आपापल्या प्लेटमध्ये पदार्थ घेतले असले, तरी कोणाचा हात तोंडात जात नव्हता. फक्त आश्‍चर्याने बोटे तोंडात जात होती, की धोनी म्हणजेच त्याचा लाडका ‘माही भाई’ इतका मोठा निर्णय इतक्‍या साधेपणाने घेऊन इतक्‍या शांतपणे जेवण कसे करू शकतो.

भावनिक पूर ओसंडून गेल्यावर सगळे खेळाडू मनातून स्थिर झाले. धोनीनेच सगळ्यांना संघ राहत असलेल्या हॉटेलमधे संघाची चर्चा करायची कॉमन रूम होती तिथे बोलावले. मग रंगली गप्पांची, गाण्यांची, खाण्याची दिलखुलास मैफल. कोणी डोके लढवले होते माहीत नाही, पण जे संगीत चालू होते त्यात जास्त करून दोस्तीवरची गाणी लावली गेली. सगळे खेळाडू धोनीने आपल्याला मार्गदर्शन कसे केले याच्या कहाण्या सांगत भावना व्यक्त करत होते. मधूनच धोनी खेळाडूंना अजून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे सांगत होता.

मैफील रंगत गेली तसे गेली १६ वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा करणारा विक्रमी कप्तान महान विकेटकीपर आणि धडाकेबाज आणि त्यापेक्षा अत्यंत भरवशाचा खेळाडू महेंद्रसिंग धोनीने खास त्याच्या शैलीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्याच्या सत्याला सगळे खेळाडू कसेबसे मान्य करू लागले होते.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या