ऐतिहासिक यशाचा आनंद अवर्णनीय : भक्ती कुलकर्णी

किशोर पेटकर
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

‘‘ऐतिहासिक यशात माझाही वाटा राहिला ही भावना खूप मोठी आहे. आनंद अवर्णनीय आहे. ऑलिंपियाड सुवर्णपदकाची मानकरी ठरणे खूपच सुखावणारे आणि अभिमानास्पद आहे. व्यक्तिशः माझा आत्मविश्वास कमालीचा उंचावलाय,’’ असे मडगाव येथील भक्तीने भारताच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सांगितले. 

पणजी: भारताने रशियासह ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत रविवारी ऐतिहासिक संयुक्त विजेतेपद मिळविले. फिडेच्या या प्रतिष्ठित स्पर्धेतील भारतीय संघाच्या विजयी वाटचालीत गोव्याची इंटरनॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णी हिचाही वाटा राहिला. या यशाचा आनंद अवर्णनीय असल्याची प्रतिक्रिया तिने दिली.

भक्तीने गट अ साखळी फेरीत इंडोनेशिया, जर्मनी आणि झिंबाब्वेविरुद्ध विजयाची नोंद केली. तिने झिंबाब्वेची लिंडा शाबा, इंडोनेशियाची इंटरनॅशनल मास्टर मेदिना वार्दा ऑलिया व जर्मनीची वूमन ग्रँडमास्टर फिलिझ ओस्मानोजा या खेळाडूंना हरविले. बाकी लढतीत ती राखीव फळीत होती.

‘‘ऐतिहासिक यशात माझाही वाटा राहिला ही भावना खूप मोठी आहे. आनंद अवर्णनीय आहे. ऑलिंपियाड सुवर्णपदकाची मानकरी ठरणे खूपच सुखावणारे आणि अभिमानास्पद आहे. व्यक्तिशः माझा आत्मविश्वास कमालीचा उंचावलाय,’’ असे मडगाव येथील भक्तीने भारताच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सांगितले. 

कोविड-१९ मुळे यंदाची ऑलिंपियाड स्पर्धा रद्द होण्याची शक्यता होती, मात्र स्पर्धा ऑनलाईन खेळविल्याबद्दल भक्तीने फिडेचेही आभार मानले. राष्ट्रीय महिला विजेती असलेल्या भक्तीचे क्लासिकल बुद्धिबळात सध्या २३९१ एलो मानांकन आहे. राष्ट्रीय विजेतेपद आणि मानांकनामुळे भक्तीला ऑलिंपियाड स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले.

रशियाविरुद्ध अंतिम लढतीत रविवारी तांत्रिक कारणास्तव भारतीय खेळाडूंनी डाव गमावल्याचे जाहीर झाल्यानंतर भारताने दाद मागितली, त्यानंतर फिडेने अधिकृत निर्णय घोषित केला,  तोपर्यंतचा काळ खूपच अस्वस्थ करणारा होता, असे भक्ती म्हणाली. भारताला रशियासह संयुक्त विजेते जाहीर केल्यानंतर झालेला आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही, असे सलग दोन वर्षे महिलांत राष्ट्रीय विजेती असलेल्या भक्तीने सांगितले. ऑलिंपियाड स्पर्धेत सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली, हा अनुभव खूपच संस्मरणीय असल्याचे मत तिने व्यक्त केले.

सलग दोन वर्षे राष्ट्रीय विजेती
भक्तीने प्रथमच बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. तिने नोव्हेंबर २०१८ मध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविले, गतवर्षी तमिळनाडूत झालेल्या स्पर्धेत तिने हे जेतेपद आपल्याकडेच राखले. गतवर्षीच तिच्या इंटरनॅशनल मास्टर किताबावरही शिक्कामोर्तब झाले होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या