WTC 2023 जिंकायची असेल, तर रोहितसेनेला करावी लागेल 52 वर्षांपूर्वीच्या 'त्या' कामगिरीची पुनरावृत्ती

अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली द ओव्हलवर भारताने 52 वर्षांपूर्वी अविस्मरणीय सामना खेळाला होता.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Team India 1st Test Win at the Oval: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 चा अंतिम सामना इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर खेळला होता. या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 85 षटकात 3 बाद 327 धावा केल्या आहेत. दरम्यान आता भारताला हा सामना जिंकायचा असेल, तर 52 वर्षांपूर्वीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागणार आहे.

साधारण 52 वर्षांपूर्वी 1971 मध्ये भारताने द ओव्हलवर इंग्लंड विरुद्ध सामना खेळला होता. त्यावेळी भारताने ओव्हलवर पहिल्यांदाच सामना जिंकण्याचा कारनामाही केला होता. त्यावेळीही भारताने प्रथम गोलंदाजी केली होती. सामन्याच्या पहिल्या तिन्ही दिवशी इंग्लंडने वर्चस्व गाजवले होते. मात्र अखेरच्या दोन दिवसात भारताच्या फिरकीपटूंनी चांगले पुनरागमन करून दिले होते.

त्यावेळचे भारताचे कर्णधार अजित वाडेकर यांनी या सामन्याबद्दल त्यांच्या 'माय क्रिकेटिंग इयर्स' या त्यांच्या आत्मचित्ररित्रात उल्लेखही केला आहे. त्यांनी लिहिले आहे की भागवत चंद्रशेखर यांनी केलेली 38 धावांच 6 विकेट्सचा स्पेल आजही भारतीय इतिहासातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. त्याची अशी क्रेझ होती की सामना संपल्यानंतर एका भारतीय रेस्टॉरंटच्या नवीन मेनूमध्ये 'चंद्रशेखर सूप' सादर करण्यात आले होते.

Team India
WTC 2023 Final, IND vs AUS: ...म्हणून भारत - ऑस्ट्रेलिया खेळाडूंसह अंपायर्सनेही बांधली काळीपट्टी, मौनही पाळले

या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 355 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून यष्टीरक्षक फलंदाज ऍलन नॉटने सर्वाधिक 90 धावा केल्या होत्या. तसेच जॉन जेमसनने 82 आणि रिचर्ड हसनने 81 धावा केल्या होत्या. भारताकडून पहिल्या डावात एकनाथ सोळकर यांनी सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर भारताने पहिल्या डावात दिलीप सरदेसाई (54), फारुख इंजिनियर (59) आणि एकनाथ सोळकर (44) अजित वाडेकर (48) यांच्या खेळींच्या जोरावर 284 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून रे इलिंगवर्थने 5 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर मात्र दुसऱ्या डावात भागवत चंद्रशेखर यांच्या 6 विकेट्सच्या स्पेलने कमाल केली. पण त्याचबरोबर श्रीनिवास वेंकटराघवन यांची गोलंदाजी आणि एकनाथ सोलकर यांनी पकडलेला ऍलन नॉटचा झेल महत्त्वाचा ठरला होता.

इंग्लंडचा नॉट दमदार फॉर्ममध्ये होता. त्याने पहिल्या डावातही चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याची विकेट महत्त्वाची ठरणार होती. पण त्याला रोखण्याची जबाबदारी वेंकटराघवन यांच्या गोलंदाजीने पार पाडली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या नॉटला वेंकटराघवन यांनी केवळ 1 धावेवर माघारी धाडले आणि भारतीय गोटात आनंद पसरला.

Team India
WTC 2023 Final मध्ये विराट-रोहित घातली मोठ्या विक्रमाला गवसणी! धोनीलाही टाकलंय मागे

वेंकटराघवन यांच्या चेंडूवर नॉटने फटका खेळला होता. पण त्याचवेळी फॉरवर्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या सोलकर यांनी हवेत सूर मारत नॉटचा झेल घेतलेला. सोलकर यांची गणना आजही भारताच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चांगले झेल घेतले आहेत. त्यातील नॉटचाही एक झेल होता, जो भारतासाठी खूप महत्त्वाची ठरली होती.

या झेलबद्दल त्यांनी 1979 मध्ये इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियासाठी 'माय बेस्ट कॅच' या लेखात सांगितले होते की 'मी सूर मारून कसाबसा चेंडूपर्यंत पोहचलो होतो. जेव्हा मी तो चेंडू पकडला तेव्हा तो माझ्या बोटांच्या टोकाच्या बाजूला होता. त्यावेळी चेंडू खालीही पडू शकत होता. पण मी तो कसाबसा पकडला आणि वेंकटने भारताला ती विकेट मिळवून दिली, ज्याची सर्वात जास्त गरज होती.'

दरम्यान, दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ केवळ 101 धावांवर सर्वबाद झाला होता. शंद्रशेखर यांच्या 6 विकेट्स व्यतिरिक्त वेंकटराघवन यांनी 2 विकेट्स आणि बिशनसिंग बेदी यांनी 1 विकेट घेतली होती. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात घेतलेल्या 71 धावांच्या आघाडीमुळे भारतासमोर 173 धावांचे आव्हान ठेवण्यात आले.

भारताने हे आव्हान 101 षटकात पूर्ण केले. भारताकडून अजित वाडेकरांनी सर्वाधिक 45 धावांची खेळी केली, तसेच दिलीप सरदेसाई यांनी 40 धावांची खेळी केली होती. भारताने हा सामना 4 विकेट्सने जिंकला होता.

Team India
WTC 2023 Final: हेडचं शतक अन् स्मिथचा संयम, भारतासाठी डोकेदुखी! पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया 300 पार

भारताचा 50 वर्षांनी विजय

यानंतर भारताला पुन्हा ओव्हलवर कसोटी सामना जिंकण्यासाठी तब्बल 50 वर्षांची वाट पाहायला लागली. भारताने 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्ध 157 धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात दुसऱ्या डावात भारताकडून रोहितने 127 धावांची खेळी केली होती. तसेच शार्दुल ठाकूरने या सामन्यात पहिल्या डावात 57 आणि दुसऱ्या डावात 60 धावांची अविस्मरणीय खेळी केली होती.

गावसकरांचे अविस्मरणीय द्विशतक

दरम्यान, द ओव्हलवरच 1979 साली झालेला भारत विरुद्ध इंग्लंड सामना सुनील गावसकरांच्या द्विशतकामुळे अविस्मरणीय ठरला होता. भारताला चौथ्या डावात 438 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा होता. तेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये एवढ्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग कधीही झाला नव्हता. पण त्यावेळी गावसकरांनी 221 धावांची शानदार खेळी केली होती.

त्यावेळी भारत विजयाच्या अगदी जवळ पोहचला होता. भारताला विजयासाठी केवळ 9 धावांची गरज होती आणि 2 विकेट्स बाकी होत्या. पण त्याचवेळी सामना अनिर्णित राहिला.

दरम्यान, भारताने आतापर्यंत ओव्हलवर खेळलेल्या आत्तापर्यंतच्या 14 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच 5 सामन्यात पराभव स्विकारला असून 7 सामने अनिर्णित राहिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com