'हिटमॅन' रोहीत शर्माच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मार्च 2021

भारताचा सलामीवीर फलंदाज आणि टीम इंडियाचा उपकर्णधार रोहीत शर्माने इंग्लंडविरुध्दच्या चौथ्या टी-ट्वेन्टी सामन्यात एका खास विक्रमाची नोंद केली आहे.

अहमदाबाद:(Hitman Rohit Sharma sets new record) भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेमधील चौथा सामना 'करो या मरो' अशा स्थितीत आला असताना भारताने 8 धावांनी अखेर हा सामना जिंकला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यामध्ये मुंबईच्या सूर्यकुमार यादवने  विस्फोटक फलंदाजी करत झंझावती अर्धशतक केले. संघाला मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये त्याने मोलाचा वाटा उचलला. परिणामी इंग्लंडला हे आव्हान पचवणे जड गेले. आणि अखरे चौथ्या सामन्यामध्ये इंग्लंडला हार पत्करावी लागली. सूर्यकुमारने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे त्याची वाहवा झाली. त्य़ाच्याशिवाय आणखी एका मुंबईच्या क्रिकेटपटूने याच टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये खास कामगिरी केली. या सामन्यात अवघ्या 12 धावांची खेळी साकारली मात्र तरीही तो एका खास विक्रमाचा नायक ठरला.

भारताचा सलामीवीर फलंदाज आणि टीम इंडियाचा उपकर्णधार रोहीत शर्माने इंग्लंडविरुध्दच्या चौथ्या टी-ट्वेन्टी सामन्यात एका खास विक्रमाची नोंद केली आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकल्यामुळे रोहीत मोठी खेळी नोंदवणार असं वाटत होतं. मात्र आर्चरच्या गोलंदाजीवर झेल देऊन बाद झाला. तरी या धावांमुळे त्याने टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्य़े 9000 धावांचा टप्पा ओलांडला. (Hitman Rohit Sharma sets new record)

IND vs ENG: टीम इंडियाच्या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने सूर्यकुमार यादव आणि...

रोहीतने 342 टी-ट्वेन्टी सामन्यामध्य़े 9000 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यामधील 2800 धावा त्याने आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी सामन्यात केल्या. अशी कामगिरी करणारा रोहीत भारताचा दुसरा, तर जगातील नववा फलंदाज ठरला आहे. रोहीतच्या आगोदर ही कामगिरी विराटने केली होती. विराटच्या नावे 302 सामन्यामध्ये 9650 धावा आहेत. तर वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल या विक्रमात अग्रेसर आहे. त्याने टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. गेलने 13,720 धावा केल्या आहेत. गेलनंतर कायरन पोलार्ड हा दुसऱ्या स्थानी असून त्याने टी-ट्वेन्टी मध्ये 10,629 धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक 10,488 धावा केल्या आहेत. 

 

संबंधित बातम्या