
India vs Australia Hockey: हॉकी प्रो लीगमध्ये भारतीय संघाने आपला विजयी रथ कायम ठेवत सलग चौथा विजय मिळवला आहे. भारतीय संघाने बुधवारी बलाढ्य ऑस्ट्रेलियन हॉकी संघाला पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभवाचा धक्का दिला. भारताने यापूर्वी 12 मार्चला झालेल्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते.
बुधवारी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात निर्धारित वेळेनंतर 2-2 अशी बरोबरी झाली होती. त्यानंतर सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये गेला. यामध्ये भारताने 4-3 असा विजय मिळवला.
भारताकडून विवेक सागर प्रसाद (2') आणि सुखजित सिंग (47') यांनी गोल केले. तसेच पेनल्टी शुटआऊटमध्ये हरमनप्रीत सिंग, सुखजीत, दिलप्रीत सिंग यांनी गोल नोंदवले.
या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला होता. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर कर्णधार हरमनप्रीतने जोरदार ड्रॅगफ्लिक केले, पण ऑस्ट्रेलियन किपर जोहान डर्स्टच्या पॅडने गोल रोखला, मात्र, विवेक सागर प्रसादने रिबाऊंडवर गोल नोंदवला. महत्त्वाचे म्हणजे हा विवेकचा भारतासाठी 100 वा सामनाही होता.
यानंतरही भारताने चांगला खेळ करत अनेक संधी निर्माण केल्या होत्या, मात्र गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. मात्र तिसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करत 37 व्या मिनिटाला पहिला गोल केला. नॅथन एफ्राम्सने पेनल्टी स्ट्रोकवर गोल साकारला.
त्यानंतर चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच सामन्याच्या 47 व्या मिनिटाला सुखजीत सिंगने मैदानी गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. पण भारतीय बचावाकडून झालेल्या चूकीमुळे 52 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला महत्त्वाचा पेनल्टी कॉर्नर मिळाला. ज्यावर ऑस्ट्रेलियाने गोल करत सामन्यात बरोबरी साधली. अखेर हा सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये पोहोचला.
शुटआऊटमध्ये भारताचा अनुभवी गोलकिपर श्रीजेशची कामगिरी महत्त्वाची ठरली. त्याने ऑस्ट्रेलियाचे गोल रोखण्याबरोबरच महत्त्वाचा रिव्ह्यू देखील घेतला. त्यामुळे भारताला विजय मिळवणे सोपे झाले.
दरम्यान, हॉकी प्रो लीगमधील भारतातील भारतीय संघाचा हा अखेरचा सामना होता. आता या स्पर्धेतील पुढील सामने खेळण्यासाठी भारतीय संघ मे 2023 मध्ये युरोप दौरा करेल. युरोप दौऱ्यात भारताला बेल्जियम, ब्रिटन, नेदरलँड्स आणि अर्जेंटिना संघाविरुद्ध सामने खेळायचे आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.