'आयएसएल'च्या कालच्या सामन्यात दुखापतग्रस्त हैदराबादची जमशेदपूरशी 1-1 बरोबरी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या हैदराबाद एफसीला बुधवारी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत बरोबरीवर समाधान मानावे लागले. सामना संपण्यास पाच मिनिटे असताना गोल नोंदवत जमशेदपूर एफसीने 1-1 बरोबरीसह गुण विभागून घेतला.

 पणजी : प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या हैदराबाद एफसीला बुधवारी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत बरोबरीवर समाधान मानावे लागले. सामना संपण्यास पाच मिनिटे असताना गोल नोंदवत जमशेदपूर एफसीने 1-1 बरोबरीसह गुण विभागून घेतला.

 

सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला. स्पॅनिश आरिदाने सांताना याने 50 व्या मिनिटास हैदराबादला आघाडी मिळवून दिल्यानंतर नायजेरियन स्टीफन इझे याने 85 व्या मिनिटास जमशेदपूरची पिछाडी भरून काढली. हैदराबादची ही स्पर्धेतील दुसरी बरोबरी ठरली. अपराजित असलेल्या या संघाचे आता तीन लढतीतून पाच गुण झाले आहेत. जमशेदपूरला सलग दुसऱ्या लढतीत बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यांचे तीन लढतीतून दोन गुण झाले आहेत. सामना संपण्याच्या वाटेवर असताना हैदराबादच प्रशिक्षक मान्युएल मार्किझ मैदानात आले, त्यामुळे रेफरी रक्तिम साहा यांनी प्रशिक्षकास रेड कार्ड दाखविले.

 

गोलशून्य पूर्वार्धानंतर पाच मिनिटांनी हैदराबादचा स्पॅनिश कर्णधार अरिदाने सांताना याने बरोबरीची कोंडी फोडली. रिबाऊंडवर त्याने जमशेदपूरचा गोलरक्षक पवन कुमार याला चकविले. यावेळी हितेश शर्माचा फटका थोपविण्यात पवनने यश मिळविले होते, पण सांतानाला रोखू शकला नाही. सामना संपण्यास चार मिनिटे असताना आरिदाने याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. सामन्याच्या 56व्या मिनिटास आशिष राय याने सोपी संधी गमावल्यामुळे हैदराबादचे मोठे नुकसान झाले.

 

सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना नायजेरियन स्टीफन इझे याने जमशेदपूरला बरोबरी साधून दिली. नेरियूस व्हॅल्सकिस याच्या क्रॉसपासवर विल्यम चिंग्लेन्साना लालनुनफेला याने दिलेल्या पासवर इझेने सुरेखपणे लक्ष्य साधले. नियमित गोलरक्षक सुब्रत पॉलच्या जागी असलेल्या लक्ष्मीकांत कट्टीमनीस चेंडूचा अंदाज आला नाही आणि हैदराबादने यंदाच्या स्पर्धेतील पहिला गोल स्वीकारला. शेवटच्या मिनिटास कर्णधार पीटर हार्टली याचा हेडर क्रॉसबारवरून गेल्यामुळे जमशेदपूरला आघाडी घेता आली नाही. त्यापूर्वी ७१व्या मिनिटास गोल ऑफसाईड ठरल्यामुळे जमशेदपूरच्या पदरी निराशा आली होती.

 

हैदराबादला पूर्वार्धात आघाडी घेण्याची चांगली संधी होती, पण विश्रांतीला चार मिनिटे बाकी असताना हालिचरण नरझारी याचा सणसणीत फटका गोलपोस्टला आपटल्यामुळे जमशेदपूरवरील मोठे संकट टळले.

 

हैदराबाद संघ आजच्या लढतीत तीन हुकमी खेळाडूंविना मैदानात उतरला. मागील दोन सामन्यात एकही गोल न स्वीकारलेला गोलरक्षक सुब्रत पॉल अनुपलब्ध ठरला. ऑस्ट्रेलियन आघाडीपटू जोएल चियानेज व स्पॅनिश मध्यरक्षक लुईस सास्त्रे सामन्यासाठी तंदुरुस्त ठरू शकले नाहीत.

 

दृष्टिक्षेपात...

- हैदराबादच्या आरिदाने सांताना याचे यंदाच्या आयएसएलमध्ये 2 गोल

- जमशेदपूरविरुद्धच्या 3 लढतीत आरिदानेचे 4 गोल

- आयएसएलमध्ये आरिदाने याचे एकूण 11 गोल

- स्टीफन इझे याचा आयएसएल स्पर्धेतील पहिलाच गोल

- हैदराबादचे 384, तर जमशेदपूरचे 376 पास

 

अधिक वाचा :

ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा निसटता विजय 

 

संबंधित बातम्या