ISL : विजयासह हैदराबाद `टॉप थ्री`मध्ये; चेन्नईयीनवर मोसमात दुसरा विजय 

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 31 जानेवारी 2021

हैदराबाद एफसीने चेन्नईयीन एफसीवर मोसमातील सलग दुसरा विजय नोंदवत सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला.

पणजी : हैदराबाद एफसीने चेन्नईयीन एफसीवर मोसमातील सलग दुसरा विजय नोंदवत सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. त्यांनी सामना 2-0 फरकाने जिंकत एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेडला खाली ढकलले. हैदराबादचा संघ आता सलग सात सामने अपराजित आहेत.

सामना रविवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. स्पॅनिश आघाडीपटू फ्रान सान्डाझा याने 28व्या मिनिटास पहिला गोल केल्यानंतर बदली खेळाडू ऑस्ट्रेलियन ज्योएल चियानेज याने 83व्या मिनिटास हैदराबादची आघाडी भक्कम करणारा गोल नोंदविला. उत्तरार्धात सोप्या संधी गमावणे चेन्नईयीनला चांगलेच महागात पडले.

मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने सलग चार बरोबरीनंतर विजय नोंदविला. हैदराबादचा हा 15 लढतीतील पाचवा विजय ठरला. त्यांचे आता 22 गुण झाले असून एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेडपेक्षा एक गुण जास्त आहे. चेन्नईयीन एफसीला पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे 15 लढतीनंतर 16 गुण व सहावा क्रमांक कायम राहिला. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही हैदराबादने चेन्नईयीनवर मात केली होती.

ISL : ओडिशा, जमशेदपूरची विजयासाठी धडपड

सामन्याच्या पहिल्या कुलिंग ब्रेकपूर्वी हैदराबादने आघाडी घेतली. 36 वर्षीय स्पॅनिश स्ट्रायकर फ्रान सान्डाझा याने जुआव व्हिक्टर याच्या असिस्टवर प्रतिस्पर्धी बचावपटू दीपक टांग्री याला चकवा दिल्यानंतर गोलरक्षक विशाल कैथचा बचाव भेदत गोल केला. सान्डाझाचा हा सलग दुसऱ्या लढतीतील गोल ठरला.  

संघाचा पहिला गोल केलेल्या सान्डाझा याच्या जागी 52व्या मिनिटास मैदानात उतरलेल्या चियानेज याने सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना जुआव व्हिक्टरच्या असिस्टवर गोल केला. चियानेजने पेनल्टी क्षेत्रातून मारलेल्या फटक्यावर चेंडूने नेटमध्ये लक्ष्य साधले.

विश्रांतीनंतरच्या दुसऱ्याच मिनिटास चेन्नईयीनला बरोबरीची सुरेख संधी होती, पण गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याला रोखता न आलेला एली साबिया याचा सणसणीत फटका गोलपट्टीस आपटल्यामुळे चेन्नईयीनला गोलसाठी प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर 67व्या मिनिटास चेन्नईयीनची आणखी एक संधी गोलपट्टीमुळे हुकली. ताजिकिस्तानच्या फात्खुलो फात्खुलोएव याचा कमजोर फटका गोलरक्षक जाग्यावर नसताना गोलपट्टीस आपटला. 79व्या मिनिटास समोर मोकळे नेट असताना अगदी जवळून रहीम अली अचूक फटका मारू शकला नाही, त्यामुळे चेन्नईयीनची आणखी एक संधी हुकली.

दृष्टिक्षेपात...

- फ्रान सान्डाझा याचे सलग 2 लढतीत गोल

- ज्योएल चियानेज याचे 8 लढतीत 3 गोल

- पहिल्या टप्प्यात बांबोळी येथे हैदराबादची चेन्नईयीनवर 4-1 फरकाने मात

- हैदराबाद सलग 7 लढती अपराजित, 3 विजय, 4 बरोबरी

- हैदराबादच्या स्पर्धेत 5 क्लीन शीट्स
 

संबंधित बातम्या