`फोर स्टार` हैदराबादने मरगळ झटकली ; चेन्नईयीनला नमवून सलग तीन पराभवानंतर साकारला विजय

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 5 जानेवारी 2021

भारताचा आंतरराष्ट्रीय मध्यरक्षक हालीचरण नरझारी याच्या दोन गोलच्या बळावर हैदराबाद एफसीने अखेर मरगळ झटकली. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात सलग तीन पराभव पत्करल्यानंतर त्यांनी काल चेन्नईयीन एफसीवर `फोर स्टार` विजय नोंदविला.

पणजी :  भारताचा आंतरराष्ट्रीय मध्यरक्षक हालीचरण नरझारी याच्या दोन गोलच्या बळावर हैदराबाद एफसीने अखेर मरगळ झटकली. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात सलग तीन पराभव पत्करल्यानंतर त्यांनी काल चेन्नईयीन एफसीवर `फोर स्टार` विजय नोंदविला.

सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. हैदराबादने चेन्नईयीनला 4-1 फरकाने हरवून नऊ सामन्यांतील एकंदरीत तिसरा विजय प्राप्त केला. त्यामुळे मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे 12 गुण झाले असून सहाव्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली आहे. आसामच्या हालीचरण याने अनुक्रमे 53 व 79व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. याशिवाय ऑस्ट्रेलियन ज्योएल चियानेज याने 53व्या, तर ब्राझीलियन जुआंव व्हिक्टर याने 74व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. चेन्नईयीनची पिछाडी 67व्या मिनिटास अनिरुद्ध थापा याने कमी केली.

सलग चार सामने अपराजित असलेल्या साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन एफसीला तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे त्यांचे नऊ लढतीनंतर 10 गुण कायम राहिले. त्यांची आता आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

सामन्याच्या पूर्वार्धात चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ याला चकवा देणे हैदराबादला जमले नाही, त्यामुळे त्यांना आघाडीपासून दूर राहावे लागले. मात्र विश्रांतीनंतरच्या तीन मिनिटांत दोन गोल नोंदवत हैदराबादने पूर्वार्धात गमावलेल्या संधीची भरपाई केली. विश्रांतीनंतरच्या पाचव्याच मिनिटास दुखापतीनंतर पुनरागमन करणारा ऑस्ट्रेलियन आघाडीपटू ज्योएल चियानेज याने हैदराबादने खाते उघडले. गोलरक्षक कैथ आणि चेन्नईयीनचा बचावपटू एली साबिया यांच्यातील गोंधळाचा लाभ उठवत चियानेज याने अगदी सोपा गोल केला. बंगळूर एफसीविरुद्धच्या सामन्यात जायबंदी झालेल्या 30 वर्षीय चियानेज याने आज यशस्वी पुनरागमन केले. तीन मिनिटानंतर हालीचरण नरझारी याने मोसमातील वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची आघाडी वाढविली. 26 वर्षीय मेहनती मध्यरक्षकाचा फटका भेदक ठरला.

सामन्याच्या 67व्या मिनिटास हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीच्या चुकीमुळे चेन्नईयीनच्या अनिरुद्ध थापा याने संघाची पिछाडी एका गोलने कमी केली. मात्र दुसऱ्या कुलिंग ब्रेकपूर्वी ब्राझीलियन मध्यरक्षक जुआंव व्हिक्टर याने हैदराबादच्या खाती तिसऱ्या गोलची भर टाकली. रिबाऊंडवर महंमद यासीर याने दिलेल्या पासवर व्हिक्टरच्या सणसणीत फटक्यासमोर कैथ पूर्णपणे हतबल ठरला. 79व्या मिनिटास हाचीलरण नरझारी सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत हैदराबादची स्थिती खूपच भक्कम केली. प्रतिहल्ल्यावर फ्रान सांडाझा याच्या असिस्टवर नरझारीने सामन्यात दुसऱ्यांदा चेंडूला नेटची दिशा दाखविली.

 

दृष्टिक्षेपात...

- ज्योएल चियानेज याचा 3 आयएसएल लढतीत 1 गोल

- 2 गोलसह हालीचरण नरझारी याचे मोसमात 4, तर 68 आयएसएल लढतीत 5 गोल

- अनिरुद्ध थापा याचे मोसमात 2, तर आयएसएलमधील 63 लढतीत 5 गोल

- जुआंव व्हिक्टर याचे मोसमात 2 गोल

- गतमोसमात 2 लढती गमावल्यानंतर हैदराबादची चेन्नईयीनवर मात

 

.........................

संबंधित बातम्या