ISL 2020-21 : हैदराबादने केरळा ब्लास्टर्सला चार गोलने नमवून तिसऱ्या क्रमांकावर घेतली झेप 

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

हैदराबाद एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीचा दावा अजून मजबूत केला आहे. त्यांनी केरळा ब्लास्टर्सला 4 - 0 फरकाने हरवून तिसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली, तसेच मोठ्या विजयासह गोलसरासरीही +8 अशी सरस केली.

पणजी : हैदराबाद एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीचा दावा अजून मजबूत केला आहे. त्यांनी केरळा ब्लास्टर्सला 4 - 0 फरकाने हरवून तिसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली, तसेच मोठ्या विजयासह गोलसरासरीही +8 अशी सरस केली.

INDvsENG 2nd Test : जाणून घ्या टीम इंडियाच्या विजयात कोणते ठरले टर्निग पॉईंट्स  

सामना मंगळवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. हैदराबाद एफसीच्या विजयात स्पॅनिश आघाडीपटू फ्रान सान्डाझा याने पहिला गोल 58 व्या मिनिटास, तर नंतर 63 व्या मिनिटास पेनल्टीवर दुसरा गोल केला. हुकमी स्पॅनिश स्ट्रायकर आरिदाने सांतानाने 86 व्या मिनिटास सेटपिसेसवर भेदक हेडिंग साधत हैदराबादची आघाडी मजबूत केली. नंतर 90+1 व्या मिनिटास सांताना याच्या असिस्टवर ब्राझीलियन जुआव व्हिक्टर याने हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. केरळा ब्लास्टर्सला चारही गोल कमजोर बचावामुळे स्वीकारावे लागले. सांताना सामन्याचा मानकरी ठरला.

हैदराबादचा हा 18 लढतीतील सहावा विजय ठरला. एटीके मोहन बागान (36 गुण) व मुंबई सिटी (34 गुण) यांच्यानंत तिसरा क्रमांक मिळविताना हैदराबादने खात्यात 27 गुण जमा केले आहेत. त्यांचे आता चौथ्या क्रमांकावरील नॉर्थईस्ट युनायटेडपेक्षा एक गुण, तर पाचव्या क्रमांकावरील एफसी गोवापेक्षा तीन गुण जास्त आहेत. केरळा ब्लास्टर्सला आठवा पराभव पत्करावा लागला. 18 लढतीनंतर त्यांचे 16 गुण आणि दहावा क्रमांक कायम राहिला. पहिल्या टप्प्यात केरळा ब्लास्टर्सकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाचीही परतफेड हैदराबादने केली.

केरळा ब्लास्टर्स अतिशय कमजोर बचावामुळे हैदराबादला गोलशून्य पूर्वार्धानंतर पाच मिनिटांत दोन गोल नोंदविणे शक्य झाले. 36 वर्षीय स्पॅनिश स्ट्रायकर फ्रान सान्डाझा याने संघाला आघाडी प्राप्त करून दिली. विश्रांतीनंतर तेराव्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सच्या बचावफळीतील बकारी कोने आणि कॉस्ता न्हामोईनेसू यांच्या कमकुवत कामगिरीमुळे सान्डाझाला गोल नोंदविणे शक्य झाले. त्यानंतर केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स याला पेनल्टी क्षेत्रात हैदराबादच्या ज्योएल चियानेज याला अनावश्यक खाली पाडणे खूपच महागात पडले. रेफरीने पेनल्टी फटक्याची खूण केल्यानंतर गोम्स सान्डाझाचा कल्पक फटका रोखू शकला नाही. त्यानंतर पुढच्याच मिनिटास सान्डाझाची जागा बदली खेळाडू लिस्टन कुलासो याने घेतली.

दृष्टिक्षेपात...

- फ्रान सान्डाझा याचे स्पर्धेतील 9 लढतीत 4 गोल

- आरिदाने सांताना याचे 17 सामन्यांत 9 गोल, एकंदरीत 31 आयएसएल सामन्यात 18 गोल

- जुआव व्हिक्टर याचे यंदा 15 सामन्यांत 3 गोल

- बचावफळीत कमकुवत ठरलेल्या केरळा ब्लास्टर्सवर सर्वाधिक 33 गोल

- हैदराबादचे स्पर्धेत एकूण 25 गोल, उत्तरार्धात खेळात 20

- हैदराबादच्या स्पर्धेत 7 क्लीन शीट्स

- पहिल्या टप्प्यात केरळा ब्लास्टर्सची हैदराबादवर 2-0 फरकाने मात
 

संबंधित बातम्या