'आयएसएल'मध्ये 'हैदराबाद एफसी'ची विजयी घौडदौड सुरूच ; एटीके मोहन बागानला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले

दैनिक गोमन्तक
शनिवार, 12 डिसेंबर 2020

पेनल्टी फटक्यावर नोंदविलेल्या गोलमुळे हैदराबाद एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील अपराजित मालिका कायम राखली. काल त्यांनी एटीके मोहन बागानला 1-1 असे गोलबरोबरीत रोखून एक गुण विभागून घेतला.

पणजी   : पेनल्टी फटक्यावर नोंदविलेल्या गोलमुळे हैदराबाद एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील अपराजित मालिका कायम राखली. काल त्यांनी एटीके मोहन बागानला 1-1 असे गोलबरोबरीत रोखून एक गुण विभागून घेतला. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. गोलशून्य पूर्वार्धानंतर सामन्यातील दोन्ही गोल उत्तरार्धातील खेळात झाले. मानवीर सिंगने 54व्या मिनिटास एटीके मोहन बागानला आघाडी मिळवून दिल्यानंतर जुवाव व्हिक्टर याने 65व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर हैदराबादला बरोबरी साधून दिली.

 

 

एटीके मोहन बागानची ही आयएसएलच्या सातव्या मोसमातील पहिलीच बरोबरी ठरली. त्यांचे आता पाच सामन्यातून 10 गुण झाले असून मुंबई सिटीनंतर (12 गुण) गुणतक्त्यात दुसरा क्रमांक आहे. स्पर्धेत अपराजित असलेल्या हैदराबादची ही तिसरी बरोबरी आहे. त्यांनी एका लढतीत विजय मिळविला आहे. चार लढतीनंतर सहा गुण झाले आहेत. ते आता पाचव्या स्थानी आले आहेत. हैदराबादच्या आघाडीफळीत व्यस्त राहिलेला लिस्टन कुलासो सामन्याचा मानकरी ठरला. मानवीरने विश्रांतीनंतरच्या नवव्या मिनिटास हैदराबादच्या ठिसूळ बचावाचा लाभ उठवत एटीके मोहन बागानला आघाडी मिळवून दिली. हैदराबादचा बचावपटू ओदेई ओनैनदिया मानवीरला रोखू शकला नाही, त्याचा लाभ उठवत 25 वर्षीय आघाडीपटूने चेंडूला नेटची अचूक दिशा दाखविली. मात्र कोलकात्याच्या संघाची आघाडी अकरा मिनिटेच टिकली. गोल केलेल्या मानवीर सिंग याच्या चुकीमुळे त्यांना आघाडी गमवावी लागली. त्याने सौविक चक्रवर्तीच्या पासवर मुसंडी मारलेल्या हैदराबादच्या निखिल पुजारी याला गोलक्षेत्रात पाडले. रेफरी हरीश कुंडू यांनी पेनल्टी फटक्याचा योग्य निर्णय घेतला. ब्राझीलियन जुवाव व्हिक्टर याने संधी साधताना गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज ताकदवान फटका रोखणार नाही याची खात्री बाळगली.

 

 

सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल नोंदविता आला नाही. विशेषतः हैदराबादचा गोलरक्षक सुब्रत पॉल याला खूपच दक्ष राहावे लागले. वारंवार धडक मारणाऱ्या एटीके मोहन बागानच्या आक्रमणावर त्याने कडक पहारा ठेवला, त्यामुळे अंतोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला आघाडीपासून दूर राहावे लागले. जमशेदपूरविरुद्ध मागील लढतीत रेड कार्ड मिळाल्यामुळे हैदराबादच्या डगआऊटमध्ये त्यांचे मुख्य प्रशिक्षक मान्युएल मार्किझ अनुपस्थित होते. त्यांचे सहाय्यक थांगबोई सिंगटो यांनी आज मैदानावरील मार्गदर्शनाची जबाबदारी पेलली. तंदुरुस्तीअभावी आज हैदराबादच्या लाईनअपमध्ये प्रमुख खेळाडू आरिदाने सांताना याला स्थान मिळू शकले नाही. लिस्टन कुलासोने हैदराबादच्या आक्रमणात छाप पाडली, पण त्याच्या फटक्यांना अचूकतेची जोड लाभली नाही. एटीके मोहन बागानचा हुकमी आघाडीपटू रॉय कृष्णा याला मोकळीक मिळणार नाही याची दक्षता हैदराबादच्या बचावफळीने घेतली.

 

दृष्टिक्षेपात...

- एटीके मोहन बागानच्या मानवीर सिंगचे मोसमात 2 गोल

- मानवीरचे आयएसएमध्ये एकूण 5 गोल

- हैदराबादच्या जुवाव व्हिक्टरचा आयएसएलमध्ये पहिलाच गोल

- आयएसएलच्या सातव्या मोसमात एटीके मोहन बागानचे 6, तर हैदराबादचे 3 गोल

 

अधिक वाचा :

रोहित शर्मा फिटनेस टेस्ट उत्तीर्ण

साखळीत खास महिलांसाठी होणार बॅडमिंटन स्पर्धा 

संबंधित बातम्या