गोलरक्षक सुब्रतवर असेल हैदराबादची मदार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 डिसेंबर 2020

विजयाविना असलेल्या जमशेदपूर एफसीविरुद्ध खेळताना हैदराबाद एफसीची मदार गोलरक्षकाच्या दक्षतेवर असेल.

पणजी- अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉल याने इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या सातव्या मोसमात अजून एकही गोल स्वीकारलेला नाही, साहजिकच विजयाविना असलेल्या जमशेदपूर एफसीविरुद्ध खेळताना हैदराबाद एफसीची मदार गोलरक्षकाच्या दक्षतेवर असेल.

हैदराबाद व जमशेदपूर यांच्यातील सामना बुधवारी (ता. २) वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल. हैदराबादचा बचाव विरुद्ध जमशेदपूरचे आक्रमण असेच एकंदरीत सामन्याचे स्वरूप राहण्याचे संकेत आहेत. हैदराबादला खेळाडूंच्या दुखापतींचा फटका बसू शकतो. आघाडीपटू जोएल चियानेज व मध्यरक्षक लुईस सास्त्रे यांना मागील लढतीत दुखापतीमुळे बाहेर जावे लागले होते.
गोलरक्षक सुब्रतची कामगिरी हैदराबादसाठी निर्णायक ठरली आहे. दोन्ही लढतीत त्याने अभेद्य तटबंदी राखली. गतमोसमात एकदम तळात राहिलेल्या या संघाची दोन्ही लढतीत क्लीन शीट आहे. एक विजय व एक बरोबरी अशा कामगिरीसह मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने चार गुणांची कमाई केली आहे. त्यांनी ओडिशाला एका गोलने नमविले, तर बंगळूरला गोलशून्य बरोबरीत रोखले.

जमशेदपूर एफसी संघ सध्या संघर्ष करताना दिसत आहे. त्यातच त्यांचा प्रमुख गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याला ओडिशाविरुद्धच्या लढतीत गोलक्षेत्राबाहेर चेंडू हाताळल्यामुळे रेड कार्ड मिळाले होते. बदली गोलरक्षक पवन कुमार आल्यानंतर शेवटच्या १३ मिनिटांत दोन गोल स्वीकारल्यामुळे जमशेदपूरला दोन गोलांच्या आघाडीनंतर बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले होते. त्यापूर्वी त्यांना चेन्नईयीनकडून पराभव पत्करावा लागला होता. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील संघाच्या खाती दोन लढतीतून फक्त एक गुण आहे. तीन गोल करणारा लिथुआनियाचा आघाडीपटू नेरियूस व्हॅल्सकिस याच्या फॉर्मवर जमशेदपूरचे भवितव्य असेल.

संधी निर्माण करणे आवश्यक- मार्किझ
हैदराबाद संघ अपराजित असला, तरी संघाला सर्व आघाड्यांवर प्रगती साधणे गरजेचे असल्याचे मत प्रशिक्षक मान्युएल मार्किझ यांनी व्यक्त केले आहे. विशेषतः प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात जास्त संधी निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांना वाटते. पहिल्या दोन सामन्यात संघाला जास्त संधी लाभल्या नाहीत. दूरवरून लक्ष्याच्या दिशेने फटके मारले गेले. संघाला जास्त गोल नोंदवावे लागतील, असे स्पॅनिश प्रशिक्षक म्हणाले. हैदराबादने दोन लढतीत फक्त पेनल्टीवर एक गोल नोंदविला आहे. आपला संघ सामन्यागणिक प्रगती साधत असल्यामुळे आशावादी असल्याचे मत जमशेदपूरचे प्रशिक्षक ओवेन कॉयल यांनी व्यक्त केले आहे.
 

संबंधित बातम्या