I-League 2021 : चर्चिल ब्रदर्सला गोकुळम केरळाचा धक्का; गोव्याच्या संघाचा पहिला पराभव

I-League 2021 : चर्चिल ब्रदर्सला गोकुळम केरळाचा धक्का; गोव्याच्या संघाचा पहिला पराभव
I League 2021 Gokulam Keralas shock to Churchill Brothers Goas first defeat

पणजी : गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स संघाची आय-लीग स्पर्धेतील अखेर अकराव्या सामन्यानंतर खंडित झाली. गोकुळम केरळा संघाने त्यांना बुधवारी पराभवाचा धक्का दिला. पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे झालेल्या सामन्यात केरळच्या संघाने 3-0 फरकाने एकतर्फी विजय प्राप्त केला. चर्चिल ब्रदर्सला सामन्याच्या चौथ्याच मिनिटास धक्का बसला. त्यांच्या वनलाल दुआत्सांगा याने स्वयंगोल केल्यामुळे गोकुळम केरळा संघास आघाडी मिळाली. त्यांच्या डेनिस अँटवी याने उत्तरार्धात दोन गोल नोंदविल्यामुळे गोकुळम केरळास स्पर्धेतील सातव्या विजयाची नोंद करता आली. अँटवी याने 56व्या मिनिटास अचूक पेनल्टी फटका मारली, तर 62व्या मिनिटास संघाला तीन गोलांची भक्कम आघाडी मिळवून दिली. अँटवी याचा हा स्पर्धेतील सातवा गोल ठरला.

आय-लीग स्पर्धेत सात विजय व चार बरोबरी साधल्यानंतर चर्चिल ब्रदर्सला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे आता 12 लढतीनंतर 25 गुण आणि अग्रस्थान कायम राहिले आहे. गोकुळम केरळाने सलग दुसरा विजय नोंदविताना एकंदरीत सातव्या विजयासह 12 सामन्यानंतर गुणसंख्या 22 वर नेली आहे. त्यामुळे आता विजेतेपदाची चुरस वाढली आहे. स्पर्धेच्या पहिल्या गोकुळम केरळास चर्चिल ब्रदर्सकडून 2-3 फरकाने हार पत्करावी लागली होती, त्याचा वचपा केरळच्या संघाने बुधवारी काढला. 

अन्य एका सामन्यात मणिपूरच्या टिड्डिम रोड अॅथलेटिक युनियन (ट्राऊ) संघाने रियल काश्मीर संघाला 3-1 फरकाने हरविले. त्यामुळे आता ट्राऊ संघाचेही 22 गुण झाले आहेत. समान गुण झाल्यानंतर गोकुळम केरळा दुसऱ्या, तर ट्राऊ संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. रियल काश्मीर संघ 17 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
आणखी एका लढतीत पंजाब एफसी व महम्मेडन स्पोर्टिंग यांच्यातील सामना 3-3 गोलबरोबरीत राहिला. पंजाब एफसी 19 गुणांसह चौथ्या, तर महम्मेडन स्पोर्टिंग 17 गुणांसह सहाव्या स्थानी आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com