I-League 2021: पिछाडीवरून मुंबई सिटी विजयी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

मुंबई सिटीने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीचा दावा आणखीनच भक्कम करताना बुधवारी पिछाडीवरून शानदार विजय साकारला.

पणजी : मुंबई सिटीने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीचा दावा आणखीनच भक्कम करताना बुधवारी पिछाडीवरून शानदार विजय साकारला. त्यांनी केरळा ब्लास्टर्सवर 2-1 फरकाने मात करून सहा गुणांच्या आघाडीसह अग्रस्थान भक्कम केले.

सामना बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर बुधवारी झाला. सामन्याच्या 27व्या मिनिटास स्पॅनिश मध्यरक्षक व्हिसेंट गोमेझ याने सेटपिसेसवर केरळा ब्लास्टर्सला आघाडी मिळवून दिली. मात्र उत्तरार्धात मुंबई सिटीने जबरदस्त उसळी घेतली. बिपिन सिंगने 46व्या मिनिटास बरोबरीचा गोल केल्यानंतर इंग्लिश खेळाडू एडम ली फाँड्रे याने 67व्या मिनिटास पेनल्टी फटका अचूक मारत मुंबई सिटीस महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. सामन्यात एका गोलचा अपवाद वगळता अप्रतिम गोलरक्षण केलेल्या अमरिंदर सिंग याची कामगिरीही मुंबई सिटीसाठी निर्णायक ठरली.

मागील लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडकडून धक्कादायक पराभव स्वीकारलेल्या सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटीचा हा 15 लढतीतील दहावा विजय ठरला. त्यांचे 33 गुण झाले असून दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानपेक्षा सहा गुण जास्त आहेत. किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा ब्लास्टर्सचा हा 16 लढतीतील सातवा पराभव ठरला. त्यांचे 15 गुण व नववा क्रमांक कायम राहिले. या निकालामुळे केरळा ब्लास्टर्सच्या प्ले-ऑफ फेरीतील आशांनाही धक्का बसला आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही मुंबई सिटीने केरळमधील संघाला 2-0 फरकाने हरविले होते.

केरळा ब्लास्टर्सचा मेहनती खेळाडू सहल अब्दुल समद याच्या झंझावाती कॉर्नर फटक्यावर गोमेझ याने अफलातून हेडिंग साधले, यावेळी मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरिंदर सिंग पूर्णपणे चकला. त्यापूर्वी केरळा ब्लास्टर्सच्या राहुल केपी फटका अमरिंदरने वेळीच रोखून संघावरील संकट टाळले होते.

विश्रांतीनंतर खेळास सुरवात झाल्यानंतर अर्ध्या मिनिटातच मुंबई सिटीने बरोबरी साधली. केरळा ब्लास्टर्सच्या गोलक्षेत्रात सहकारी खेळाडूने मारलेल्या फटक्यावर 25 वर्षीय विंगर बिपिनने डाव्याने अचूक नेम साधला. यावेळी केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स पूर्णतः हतबल ठरला. आणखी २२ मिनिटानंतर केरळा ब्लास्टर्सचा झिंबाब्वेयन बचावपटू व सामन्यातील कर्णधार कॉस्ता न्हामोईनेसू याच्या चुकीमुळे मुंबई सिटीस पेनल्टी फटक्याचा लाभ मिळाला, पण हा निर्णय केरळा ब्लास्टर्स संघाला रुचला नाही. यावेळी कॉस्ताने मुंबई सिटीच्या खेळाडूस पाडले होते. फाँड्रे याने एकाग्रपणे भेदक फटका मारत गोलरक्षक आल्बिनोचा अंदाज चुकविला.

I-League 2021 : चर्चिल ब्रदर्सची ऐजॉलशी बरोबरी -

दृष्टिक्षेपात...

  • -केरळा ब्लास्टर्सच्या व्हिसेंट गोमेझचे 15 सामन्यात 2 गोल
  • - मुंबई सिटीच्या बिपिन सिंगचे मोसमातील 14 लढतीत 2 गोल
  • - एकंदरीत बिपिनचे 48 आयएसएल लढतीत 6 गोल
  • - मुंबई सिटीच्या एडम ली फाँड्रे याचे 15 लढतीत 8 गोल, पेनल्टीवर 4
  • - मुंबई सिटीवर 15 लढतीत सर्वांत कमी 8 गोल
  • - प्रतिस्पर्ध्यांचे केरळा ब्लास्टर्सवर 16 लढतीत सर्वाधिक 27 गोल
  • - मुंबई सिटीचे यंदा स्पर्धेत सर्वाधिक 22 गोल

संबंधित बातम्या