I-League 2021: स्पोर्टिंगसाठी दत्तराजचा गोल निर्णायक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

मालक पीटर वाझ यांच्या कोविडमुळे झालेल्या अकाली निधनानंतर प्रथमच मैदानात उतरलेल्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने बुधवारी भावनिक विजय प्राप्त केला.

पणजी : मालक पीटर वाझ यांच्या कोविडमुळे झालेल्या अकाली निधनानंतर प्रथमच मैदानात उतरलेल्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने बुधवारी भावनिक विजय प्राप्त केला. गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत त्यांनी वास्को स्पोर्टस क्लबवर 1-0 फरकाने मात केली.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेल्या या लढतीत दत्तराज गावकर याने नोंदविलेला गोल स्पोर्टिंगसाठी निर्णायक ठरला. दत्तराजने पूर्वार्धातील इंज्युरी टाईममध्ये चेंडूला नेटची अचूक दिशा दाखविली. गिरीश नाईक याने मैदानाच्या डाव्या भागातून दिलेल्या शानदार पासवर दत्तराजने अप्रतिम हेडिंग साधत वास्कोचा गोलरक्षक संजू थापा याला चकविले.

स्पोर्टिंगचा हा स्पर्धेतील पहिला सामना होता. मागील लढतीत चर्चिल ब्रदर्सला दोन गोलने नमविलेल्या वास्को क्लबचे पराभवामुळे दोन लढतीनंतर तीन गुण कायम राहिले. स्पर्धेत आज गुरुवारी कळंगुट असोसिएशन व एफसी गोवा यांच्यात धुळेर येथे सामना होणार आहे.

I-League 2021 : चर्चिल ब्रदर्सची ऐजॉलशी बरोबरी -

संबंधित बातम्या